पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजस्थानमधील सभेत बोलताना काँग्रेसवर आरोप केला होता की, काँग्रेस देशात आर्थिक सर्वेक्षण करून तुमची संपत्ती व सोनं हिसकावून घेणार आहे तसेच ही संपत्ती ज्यांना अधिक मुलं आहेत, त्यांना दिली जाईल. इतकेच नव्हे तर माता भगिनींचे मंगळसूत्रही काढून घेतले जाईल. यावरून राजकारण रंगले असताना काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सोमवारी घोषणा केली की, केंद्रात जर काँग्रेसची सत्ता आली तर प्राधान्याने संपूर्ण देशात जातनिहाय व आर्थिक सर्वेक्षण केले जाईल.
राहुल गांधी उत्तर गुजरातमधील पाटण शहरात एका प्रचार सभेला संबोधित करत होते. राहुल गांधी म्हणाले की, देशाची ९० टक्के लोकसंख्या एससी,एसटी आणि ओबीसी आहे. मात्र त्यांना कॉरपोरेट, मीडिया,खासगी रुग्णालये,खासगी विद्यापीठे तसेच सरकारी नोकऱ्यात त्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळत नाही.
राहुल गांधींनी भाजप व आरएसएसवर संविधान बदलण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप केला आहे. त्यांनी दावा केला आहे की, सत्तारूढ एनडीए आरक्षणाच्या विरोधात आहे. राहुल गांधींनी म्हटले की, आरक्षणाचा अर्थ आहे की, गरीब, आदिवासी, दलित आणि मागासांना प्रतिनिधीत्व देणे. मोदी खासगीकरणाच्या आड तुमचा हक्क हिरावून घेत आहे. आम्ही सत्तेत आल्यानंतर सर्वात आधी जातनिहाय व आर्थिक सर्वेक्षण करणार.
राहुल गांधी म्हणाले की, देशातील ४० टक्के संपत्तीवर केवळ १ टक्के लोकांचा अधिकार आहे. हीच देशाची वास्तव स्थिती आहे. त्यात मोदी व भाजपचे लोक म्हणतात आरक्षण संपवणार. अग्निवीर योजना व खासगीकरण आरक्षण संपवण्याची पद्धत आहे. सध्या दोन विचारधारांची लढाई आहे. एकीकडे काँग्रेस व इंडिया आघाडी आहे जे संविधान वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे मोदी व आरएसएस आहेत, जे संविधान संपवण्याचा प्रयत्न करत आहेत.
काँग्रेसने तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या आधी मोठी घोषणा केली आहे. राहुल गांधींनी म्हटले की, प्रत्येक भारतीयाला २५ लाखापर्यंतचे उपचार मोफत दिले जातील. आता कुटूंबातील व्यक्तीच्या उपचारासाठी कोणत्याही महिलेला आपले मंगलसूत्र गहाण ठेवावे लागणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील बांसवाडा येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना माजी पीएम मनमोहन सिंह यांचा हवाला देत म्हटले होते की, काँग्रेस महिलांचे मंगळसूत्र हिसकावून घेईल व ते घुसखोरांना देईल.
काँग्रेस नेते राहुल गांधींनी आपले निवडणूक आश्वासन सोशल मीडियावर शेअर करताना म्हटले की, महागाई आणि बेरोजगारीचा सामना करणाऱ्या भारतात आज प्रत्येक वर्षी ६ कोटी लोक केवळ एका ‘मेडिकल बिल’ मुळे दारिद्र्य रेषेखाली येत आहेत. महागडे उपचार, औषधे व तपासण्याच्या जंजालात सामान्य लोक व्याजाने पैसे घेतो व यातून बाहेर यायला त्याला अनेक वर्षे लागतात.
राहुल गांधी म्हणाले की, आमचा संकल्प आहे की, आम्ही २५ लाखापर्यंतचा उपचार मोफत करणार आहेत. यामुळे कोणत्याही महिलेला आपले मंगळसूत्र गहाण ठेवावे लागणार नाही.
संबंधित बातम्या