Election commition issued notis to supriya sule and sunetra pawar : बारामती लोकसभेतील उमेदवार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाने धक्का दिला आहे. त्यांच्या निवडणूक खर्चात ताळमेळ लागत नसल्याने त्यांना नोटिस बजावण्यात आली आहे. ऐवढेच नाईह तर या प्रकरणी त्यांना दोन दिवसांत खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत जिल्हा खर्च निरीक्षण समितीकडे दाद मागता येणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान येत्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. बारामती लोकसभा मतदार संघासाठी मतदान ७ मे रोजी आहे. मात्र, त्या पूर्वीच अजित पवार आणि शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने धक्का दिला आहे. बारामती मतदारसंघाच्या निवडणूक खर्चाच्या दुसऱ्या तपासणीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोन्ही उमेदवारांनी दाखविलेला आणि प्रशासनाकडे असणाऱ्या खर्चात मोठी तफावत आढळळी आहे.
यामुळे महाआघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी नोटीस बजावली आहे. दोन्ही उमेदवारांना निवडणूक आयोगाने दोन दिवसांची मुदत दिली असून या बाबत खुलासा करण्याचे आदेश दिले आहे. तसेच खुलासा न दिल्यास ही तफावत मान्य असल्याचे ग्राह्य धरून हा खर्च त्यांच्या खात्यात दाखविला जाणार आहे.
बारामती मतदारसंघात निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या प्रचार खर्चाची दुसरी तपासणी नुकतीच करण्यात आली आहे. त्यानुसार सुळे आणि पवार यांनी दाखविलेल्या खर्चात अनुक्रमे १.३ लाख आणि ९.१० लाख रुपये खर्चाची मोठी तफावत आढळली आहे. ही तफावत दोन्ही उमेदवारांच्या प्रतिनिधीने अमान्य केली आहे. यामुळे निवडणूक आयोगाने याबाबत दोन दिवसांत खुलासा करण्याचे आदेश दोन्ही उमेदवारांना दिले आहे. याबाबत जिल्हा खर्च निरीक्षण समितीकडे दाद मागीतली जाणार आहे. सध्या दोन्ही उमेदवारांचा प्रचार जोरदार सुरू आहे. जास्तीत जास्त मतदारांपर्यन्त पोहचण्याचा प्रयत्न दोन्ही उमेदवार करत आहे. त्यांचे भवितव्य ७ मे रोजी ईव्हीएममध्ये कैद होणार आहे.