PM Modi Maharashtra Daura: राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय पक्षाच्या प्रचार देखील जोरदार सुरू आहे. आपला उमेदवार निवडणून यावा यासाठी बडे नेते प्रचारात उतरले आहे. भाजप कडून स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी झंझावाती सभा घेत आहे. काल पुणे, कराड, सोलापूर येथे सभा झाल्यावर आज मोदी यांच्या म्हाडा, लातूर, धाराशीवमध्ये सभा होणार आहेत. या सभांची जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, आज मोदी विरोधकांवर काय टीका करणार या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
राज्यात लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आहेत. विदर्भात निवडणुका पार पडल्या आहेत. यानंतर ७ आणि १३ तारखेला राज्यात मतदान होणार आहे. या साठी मोदी हे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. राज्यात आज मोदी यांच्या तीन सभा होणार आहेत.
आज मंगळवारी दुपारी ११.४५ ला माढा येथील महायुतीचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी मोदी माळशिरस येथे सभा घेणार आहेत, तर दुपारी दीड वाजता धाराशिव येथे महायुतीच्या उमेदवार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अर्चना पाटील यांच्यासाठी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयालगतच्या मैदानावर मोदी सभा घेणार आहेत. तर दुपारी ३ वाजता लातूर येथे भाजपाचे सुधाकर शृंगारे यांच्यासाठी मोदी सभा घेणार आहेत. या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित राहणार आहेत.
मोदी यांच्या सभेसाठी लातूर येथे अडीच लाख चौरस फूट मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. सभेसाठी येणाऱ्यांना उन्हाचा त्रास होवू नये याची काळजी घेण्यात आली आहे. मतदारसंघातील नागरिकांनी या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन लोकसभा संयोजक माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर व महायुतीच्या नेत्यांनी केले आहेत. ही सभा गरुड चौका जवळ सारोळा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर होणार आहे. तीन मोठ्या तंबूत नागरिकांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर सुरक्षा व्यवस्था देखील चोख ठेवण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगसाठी विविध ठिकाणी स्वतंत्र वाहनतळ उभारण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उपस्थितांनी किमान एक तास आधी सभास्थळी येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.