Osmanabad Lok Sabha Constituency: काहीच तासांमध्ये आता लोकसभा निवडणूक २०२४चा निकाल सगळ्यांसमोर येणार आहे. अवघ्या देशाचे लक्ष या निकालाकडे लागून राहिले आहे. महाराष्ट्रातही लोकसभा निवडणूक २०२४च्या निकालाची रणधुमाळी दिसत आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघात यंदाही अपेक्षेप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे ओमराजे निंबाळकर आघाडी घेताना दिसत आहेत. मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यात राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. धाराशिव मतदार संघात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.
महाराष्ट्र राज्यातील सगळ्याच मतदारसंघांपेक्षा या मतदार संघातील निकालाची सगळ्यांनाच खूप उत्सुकता लागून राहिली आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये ओमराजे निंबाळकर यांनी मोठी आघाडी घेतलेली दिसत आहे. ज्या, तालुक्यांमधून अर्चना पाटील यांना मोठा विजय मिळण्याची उमेद होती, तिथे मात्र त्यांची फसगत झाल्याचं चित्र दिसलं आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेरीतच राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना नुसताच धक्का बसला नाही तर, ओमराजे निंबाळकर यांचा एक लाख मतांचा टप्पा देखील पार झाला आहे.
मराठवाड्यात छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदार संघानंतर सगळ्यांचेच लक्ष धाराशिव मतदारसंघाकडे लागले आहे. या मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी महायुतीने भरपूर प्रयत्न केले होते. या निवडणुकीसाठी मोठमोठ्या सभा, भव्य रॅली यांच्या माध्यमातून महायुतीने प्रचार करण्याची कुठलीही कसर सोडली नव्हती. तर, मी खासदार होणार आणि दिल्लीला जाणार असा विश्वास देखील ओमराजे निंबाळकर यांनी या दरम्यान अनेकदा व्यक्त केला होता. मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेरीचा निकाल पाहता ओमराजे निंबाळकर मोठ्या संख्येने आघाडीवर असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्यांचा आकडा हा त्यांना विजयाच्या दिशेने नेताना दिसत आहे.
शिवसेना बाळासाहेब ठाकरे या गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी एक लाख मतांचा टप्पा पार केला असून, चौथ्या फेरीच्या सुरुवातीला त्यांना १ लाख तीन हजार मते मिळाली. तर, अर्चना पाटील या तब्बल ४४ हजार मतांनी पिछाडीवर पडल्या आहेत. राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना हा मोठा धक्का बसला असून, ओमराजे निंबाळकर यांची आघाडी घोडदौड सुरूच आहे. मोठ्या विक्रमी मतांनी ओमराजे निंबाळकर विजय होण्याची चिन्हे दिसत आहेत. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांना १ लाख २७ हजार मत मिळाली होती आणि ते निवडून आले होते. धाराशिव मतदार संघात आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी महायुतीकडून अर्चना पाटील यांना राजकारणाच्या मैदानात उतरवण्यात आलं होतं. तर, उद्धव ठाकरे गटाने महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा एकदा तिकीट दिले होते.