काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बिहारमधील बख्तियारपूरमध्ये एका जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधी म्हणाले की, नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आता परमात्माने पाठवल्याची कहाणी घेऊन आले आहेत. जेणेकरून ४ जूननंतर ईडी द्वारे त्यांना प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणू शकतात की, मला काहीच माहिती नाही. मला तर परमात्म्याने काम करायला सांगितले होते. राहुल गांधी म्हणाले की, तुम्हाला माहिती आहे का त्यांनी परमात्मा वाली कहाणी का बाहेर काढली आहे. कारण जेव्हा ४ जूननंतर ईडीचे लोक नरेंद्र मोदींना गौतम अदानींविषयी प्रश्न विचारतील, तेव्हा ते म्हणू शकतात की, मला काहीच माहिती नाही. हे तर परमात्म्याने सांगितले होते.
राहुल गांधी म्हणाले की, तुम्ही आधी लांबलचक भाषणे देणे बंद करा व बिहार व देशातील तरुणांना आधी सांगा की, तुम्ही किती लोकांना रोजगार दिला. देशाचे तुकडे करण्यापेक्षा युवकांना रोजगार देण्यावर बोला. राहुल गांधी म्हणाले की, आधी तुमच्याकडे अनेक मार्ग होते, तुम्ही लष्कर, सरकारी नोकरी आणि खासगी नोकरीत जाऊ शकत होता. मात्र यांनी नोटाबंदी आणि जीएसटी लागू करून रोजगाराच्या संधी संपुष्टात आणल्या. त्यानंतर लष्करात भरतीसाठी अग्निवीर योजना आणून देशातील जवानांना मजूर बनवले.
राहुल गांधींनी म्हटले की, नरेंद्र मोदी सरकारचा प्रयत्न आहे की, देशात पुन्हा राजेशाही आणली जाईल. या लोकांची इच्छा आहे की, एससी, एसटी आणि ओबीसींचे अधिकार हिरावून घेतले जावेत. नरेंद्र मोदींनी देशातील २२ ते २५ लोकांना महाराजा बनवले आहे. त्यांची नावे आहेत अदानी व अंबानी. नरेंद्र मोदी यांच्यासाठी काम करतात. या लोकांचे १६ लाख कोटी रुपये माफ केले आहेत.
राहुल गांधींनी यावेळी जनतेला तीन मोठी आश्वासने दिली. त्यांनी म्हटले की, जर INDIA अलायन्सचे सरकार बनले तर लष्करात भरतीसाठी सुरू असलेली अग्निवीर योजना रद्द केली जाईल. त्याचबरोबर सर्व महिलांना प्रत्येक महिन्याला ८५०० रुपये दिले जातील. आमचे सरकार आल्यास बंद पडलेले सर्व उद्योग सुरू केले जातील. देशात ३० लाख सरकारी नोकऱ्या दिल्या जातील.