मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Congress vs BJP: सायन येथील मतदान केंद्रात भाजप कार्यकर्त्याला मारहाण, दोन जणांविरोधात गुन्हा दाखल

Congress vs BJP: सायन येथील मतदान केंद्रात भाजप कार्यकर्त्याला मारहाण, दोन जणांविरोधात गुन्हा दाखल

May 21, 2024 10:11 AM IST

Clash Between Congress And BJP Workers In Sion: मुंबईतील सायन येथील मतदार केंद्रात एका अपंग व्यक्तीला मतदान केंद्रात पोहोचण्यावरून पेटलेल्या वादातून भाजप कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली.

लोकसभा निवडणूक २०२४: मुंबईत मतदानाच्या दिवशी काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्याला मारहाण केली.
लोकसभा निवडणूक २०२४: मुंबईत मतदानाच्या दिवशी काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्याला मारहाण केली.

Clash Between Congress And BJP Workers: महाराष्ट्राच्या पाचव्या टप्प्यात मुंबईसह एकूण सहा मतदारसंघात काल मतदान झाले. या टप्प्यासह महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान संपले आहे. दरम्यान, मुंबईच्या सायन येथील मतदार केंद्रात काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. ही घटना लिटल एंजल शाळेजवळ घडली, जिथे एका अपंग व्यक्तीला मतदान केंद्रात पोहोचण्यावरून झालेल्या वादातून हा प्रकार घडला. याप्रकरणी काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपमधील श्रीनिवास एरवा नावाचा एक कार्यकर्ता व्हीलचेअरवर बसलेल्या ज्येष्ठ नागरिकाला त्याच्या बूथपर्यंत पोहोचण्यास मदत करत असताना त्याची सुरुवात झाली. एजाज नावाच्या एका स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्याने कथितपणे श्रीनिवासला विचारले की आपण संबंधित व्यक्तीला मदत का करत आहात, यामागे काही गुप्त हेतू असल्याचा त्यांना संशय आला आणि यानंतर वाद पेटला.

ओमप्रकाश जैस्वाल (५९) या भाजप कार्यकर्त्याने नोंदवलेल्या एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, एजाज आणि शकील नावाच्या व्यक्तीने ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी केलेल्या मदतीवरून गोंधळ घातला. तसेच त्याला मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. सायनमधील एका वरिष्ठ पोलिसांनी सांगितले, “आम्ही शकील आणि एजाज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. परंतु, त्यांची ओळख पटलेली नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ५०४ (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान) आणि ५०६ (२) (गुन्हेगारी धमकीसह जीवे मारण्याची धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला."

महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात ५४.३३ टक्के मतदान

कडाक्याची उष्णता, पिण्याचे पाणी, ज्येष्ठ नागरिकांसाठी पंखे, खुर्च्या अशा अपुऱ्या सुविधा आणि मतदार यादीतून अनेक नावे गायब झाल्याने लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सोमवारी महाराष्ट्रातील १३ मतदारसंघांत कमी मतदान झाले. रात्री ११ वाजेपर्यंत १३ मतदारसंघांत ५४.३३ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.

मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात ५२.२७ टक्के मतदान

मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात ५२.२७ टक्के मतदान झाले. ही तात्पुरती मोजणी असून पुढील तीन दिवसांत अंतिम आकडा अपेक्षित आहे. निवडणूक आयोगाच्या राज्य शाखेच्या अधिकाऱ्यांनी शहरातील मतदान २०१९ चा ५५.३८ टक्क्यांचा आकडा पार करेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या आदिवासीबहुल राखीव मतदारसंघात पाचव्या टप्प्यात राज्यात सर्वाधिक म्हणजे ६२.६६ टक्के मतदान झाले.

उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुपारी पत्रकार परिषद घेऊन कमी मतदानाबद्दल निवडणूक आयोगावर टीका केली आणि त्यामागे षडयंत्र असल्याचा आरोपही केला. 'ज्या भागात जास्त मतदान होते, तिथे मतदानाला उशीर होतो. लोकांना मतदानापासून परावृत्त करण्यासाठी हे करण्यात आले आहे. मतदारांना असे अधिकारी किंवा मतदान कर्मचारी हेतुपुरस्सर दिरंगाई करताना आढळल्यास त्यांची नावे शिवसेनेच्या स्थानिक शाखांकडे पाठवावीत.

WhatsApp channel