maval Lok Sabha Election 2024 updates : राज्यात लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती यायला लागले आहे. काहीसे चित्र स्पष्ट व्हायला लागले आहे. पुण्यात शिरूरमध्ये डॉ. अमोल कोल्हे, तर बारामतीत सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत. तर पुण्यातील भाजपचे मुरलीधर मोहोळ आघाडीवर आहेत. तर सर्वाचे लक्ष असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीमध्ये चुरस सुरू आहे. मावळ मतदारसंघातून महायुतीचे श्रीरंग बारणे हे सुरूवातीपासूनच आघाडीवर आहेत. तर संजोग वाघेरे हे पिछाडीवर आहेत. तब्बल ५४ हजार मतांनी ते बारणे यांच्या मागे आहेत.
मावळ लोकसभा मतदारसंघात पनवेल, उरण, कर्जत, पिंपरी, चिंचवड व मावळ हे विधानसभा मतदारसंघ असून या सहाही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. याचा फायदा हा श्रीरंग बारणे यांना झाला असून आज सकाळी मतमोजणी सुरू झाल्या पासून बारणे हे आघाडीवर आहेत.
पहिल्या फेरीपासून बारणे आघाडीवर आहेत. तर, वाघेरे हे त्यांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी विधानसभा मतदारसंघातही पिछाडीवर असल्याची माहिती आहे. बारणे यांना या मतदार संघातून मोठी आघाडी मिळाली आहे. कर्जत, उरण या विधानसभा मतदारसंघात बारणे व वाघेरे यांच्यात मोठी चुरस सुरू आहे. या मतदार संघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारणे यांच्यासाठी सभा घेतली होती. असे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असलेल्या मावळ विधानसभा मतदारसंघातून देखील वाघेरे यांना आघाडी मिळत आहे. मात्र, असे असले तरी बारणे यांनी मोठी आघाडी मिळवली आहे. त्यांची वाटचाल ही विजयाच्या दिशेने सुरू आहे.
महाराष्ट्रातील ४८जागांच्या निकालाचे चित्र हळुहळु स्पष्ट होत असून यात महायुती पिछाडीवर पडल्याचे दिसत आहे. राज्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने १० जागांवर निवडणूक लढवली होती, त्या १० ही जागांवर उमेदवार आघाडीवर आहेत. अजित पवार फुटून गेल्यानंतर शरद पवारांनी नव्या उमेदीने पक्ष बांधणी करत तसेच दिवसरात्र प्रचार करत लोकसभेत मोठं यश मिळवताना दिसत आहे. ११ वाजेपर्यंतच्या कलामध्ये १० जागांवरील सर्व उमेदवार आघाडीवर आहेत. दिंडोरीमध्ये राज्यमंत्री भारती पवार आणि भिवंडीमधील राज्यमंत्री कपिल पाटील या केंद्रीय मंत्र्यांनाही झटका बसलाय.
संबंधित बातम्या