उद्धव ठाकरेंनी आज दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ सभा घेत विरोधी उमेदवार राहुल शेवाळे यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी फडणवीस व राज ठाकरेंवरही निशाणा साधला. उद्धव ठाकरे म्हणाले अनिल देसाईंसारखा चारित्र्यवान माणूस मी तुम्हाला उमेदवार म्हणून दिला आहे. अनिल देसाईंचे राज्यसभेतील व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. पण समोर जो उमेदवार आहे, त्याचे दुसरे व्हिडिओ तुमच्याकडे आले असतील. रेवण्णा कोण कर्नाटकातला? ज्याच्याकडे फिल्म वगैरे होत्या. तसाच इथला उमेदवार असल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी केला आहे.
महाविकास आघाडीचे दक्षिण मध्य मुंबई लोकसभेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ दादरमध्ये उद्धव ठाकरेंची जाहीर सभा झाली. उद्धव ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला. उद्धव म्हणाले की, हल्ली मी काहीही बोललो तरी अर्थाचा अनर्थ केला जात आहे. देवेंद्र फडणवीस म्हणतात मी हिंदुत्व सोडले, अहो, मी भाजपला लाथ घातली आहे, हिंदुत्व कसे सोडले. सध्या माझ्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित केला जातोय. पण,मी देशभक्त आहे, मी अंधभक्त नाही,
भाजपकडे उमेदवार नाही, त्यांना आपलीच गद्दार पोरं घेऊन फिरावं लागत आहे. भारतीय जनता पक्षाला राजकारणात पोरंच होत नाहीत. त्याला मी काय करावं, त्यांना दुसऱ्यांची पोरं पळवावी लागतात.
उद्धव ठाकरेंनी यावेळी राज ठाकरेंवरही घणाघाती टीका केली.इधर से, उधर से कल शिवाजी पार्क पर लेकर आये थे, सगळे भाडोत्री होते असे म्हणत राज ठाकरेंवरही नाव न घेता हल्लाबोल केला. त्यांना ठाकरे नावाचा एक माणूस हवा होता. मग त्यांनी तोही भाडोत्री घेतलाय. त्यावर आता नको काय बोलायला, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील, अशा सुपारी बहद्दरांवर नको बोलायला.
घाटकोपरमध्ये मोदींचा रोड शो झाला, तो हिणकस होता. आशिया खंडातील सर्वात मोठं होर्डिंग कोसळलं. त्यात नेमके किती मृत्यू झाले, हा खरा आकडा समोर आलेला नाही. आणि त्याच्याच बाजूला फुलांची उधळण करून, मोदींचा रोड शो काढण्यात आला, ते सर्व मतांसाठी केले. ते सांत्वन करायला केलं का हे? असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला. तसेच, या रॅलीसाठी मुंबई पालिकेने केल्याचाही दावा केला आहे.
संबंधित बातम्या