मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Prakash Ambedkar : 'महाराष्ट्रातील ‘या’ २० जागांवर मॅच फिक्सिंग', प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

Prakash Ambedkar : 'महाराष्ट्रातील ‘या’ २० जागांवर मॅच फिक्सिंग', प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 12, 2024 11:39 PM IST

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राज्यातील काही जागांवरउमेदवारांचे फिक्सिंग झाले आहे. कल्याणची सीट उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यासाठी सोडली आहे.

प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडी व भाजपवर गंभीर आरोप
प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडी व भाजपवर गंभीर आरोप

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha elections 2024) पहिल्या टप्प्याचं मतदान १९ एप्रिल रोजी होणार आहे. त्याला केवळ आठ दिवसांचा अवधी शिल्लक राहिले आहेत. निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला असताना व आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक आरोप केला आहे. महाराष्ट्रातील २० जागांवर मॅच फिक्सिंग (candidate fixing between bjp and MVA) झाल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर (prakash Ambedkar) यांनी केला आहे. हा आरोप करताना त्यांनी मतदारसंघाची नावेच सांगितली आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राज्यातील काही जागांवर उमेदवारांचे फिक्सिंग झाले आहे.  कल्याणची सीट उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यासाठी सोडली आहे.  कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरोधात वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली आहे. पंकजा मुंडे लढत असलेल्या बीडमधून एनसीपीने ५ वेळा पराभूत झालेल्या व्यक्तीला पुन्हा उमेदवारी दिली.   बीडमध्ये पंकजा मुंडेंविरोधात बजरंग सोनावणेंना रिंगणात उतरवलं आहे. याचा अर्थ काय? तुम्ही कधी याचा अर्थच काढत नाही. नवीन चेहरे आणि नवीन कार्यकर्ते असूनही तुम्ही त्यांना रिपीट करता. मी अशी २० नावं सांगू शकतो जिथे उमेदवार फिक्सिंग आहे. 

बुलढाण्यात शिवसेनेचा उमेदवार जाधव एकनाथ शिंदेंसोबत आहे, त्यालाच एकनाथ शिंदेंनी उमेदवारी दिली आहे. उद्धव ठाकरेंनी त्याच्या पीएला उमेदवारी दिली आहे. ही मॅच फिक्सिंग आहे का नाही? हे इंटरनॅशनल मॅच फिक्सिंग झालेलं आहे. यात मी अधिक काही बोलत नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. बुलढाण्यात एकनाथ शिंदेंनी विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना तर उद्धव ठाकरेंनी नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने आतापर्यंत पाच उमेदवार याद्या जाहीर केल्या असून ३५ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. प्रकाश आंबेडकर अकोल्यातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. काही ठिकाणी वंचितने काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. प्रकाश आंबेडकरांनी कोल्हापूर मतदारसंघात शाहू महाराजांना पाठिंबा दिला आहे. वंचितला महाविकास आघाडीत सामील करून घेण्यासाठी मविआच्या नेत्यांनी खूप प्रयत्न केले मात्र अखेरच्या क्षणी जागावाटपाची चर्चा फिसकटल्याने प्रकाश आंबेडकरांनी वेगळी वाट धरली आहे. त्यांनी ३५ ठिकाणी उमेदवार देत महाविकास आघाडीचे टेन्शन वाढवलं आहे.

WhatsApp channel