केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जळगाव दौऱ्यावर अजून या सभेत त्यांनी शरद पवारांवर घणाघाती टीका केली आहे. अमित शहांनी शरद पवार व इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल करत आगामी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग महाराष्ट्रात फुंकलं आहे. अमित शहांनी उद्धव ठाकरे, सोनिया गांधींवरही निशाणा साधला. जे पक्ष स्वत:च्या पक्षात लोकशाही ठेवत नाही, जे पक्ष परिवारवादातून चालतात, ते पक्ष देशाच्या लोकशाहीला कसे मजबूत करतील? असा सवाल अमित शहांनी विचारला आहे.
शरद पवारांवर जोरदार हल्ला चढवताना अमित शहा यांनी म्हटलं की, शरद पवारांना गेल्या ५० वर्षापासून जनता सहन करत आहे, पवारांनी आपल्या फक्त ५ वर्षांचा हिशोब द्यावा. महाराष्ट्राची जनता ५ दशके पवारांचं ओझं वाहत आहे.
अमित शहा म्हणाले की, महाविकास आघाडीच्या तीनचाकी रिक्षाचे तिन्ही चाकं पंक्चर आहेत. ही पंक्चर असणारी रिक्षा महाराष्ट्राचा विकास करू शकत नाही.
मोदी विरोधकांची इंडिया आघाडी फक्त आपल्या मुलामुलींसाठी आहे. सोनिया गांधींना राहुल गांधींना देशाचं पंतप्रधान बनवायचं आहे, उद्धव ठाकरेंना आदित्यला तर शरद पवारांना आपल्या मुलीला मुख्यमंत्री बनवायचं आहे. ममता दिदींना भाच्याला तर स्टॅलिनला त्याच्या मुलाला मुख्यमंत्री बनवायचं आहे. यामध्ये तुमच्यासाठी कुणी आहे का? विरोधक त्यांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री करण्यासाठी झटत आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तुमच्या भविष्यासाठी झटत असल्याचे अमित शहा म्हणाले.
मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळात ११ व्या क्रमांकावर असलेली भारतीय अर्थव्यवस्था आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १० वर्षाच्या कार्यकाळात ५ व्या क्रमांकावर पोहचली आहे. आगामी काळात देशाची अर्थव्यवस्था ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल, ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरेंटी असल्याचे अमित शहा म्हणाले.
संबंधित बातम्या