saamna editoral : देशातील लोकसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. या निवडणुकीत राज्यात उद्धव ठाकरे गटाने चांगली कामगिरी केली. तर भाजप व एनडीए बहुमताच्या जवळपास गेले असले तरी त्यांना स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. भाजपचा हा मोठा पराभव असून मोदी यांच्या अहंकाराचा गाडा रोखला गेला, अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
देशात लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहे. हे निकाल जाहीर झाल्यावर राज्यात भाजप आणि महायुतीला जोरदार फटका बसला. देशात जरी एनडीएसरकार बहुमताच्या जवळ असले तरी त्यांचा स्पष्ट विजय या निवडणुकीत झालेला नाही. त्यामुळे काल पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी मोदी अमित शहा यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा समाचार घेण्यात आला आहे. देशाच्या जनतेने अहंकारी मोदी व त्यांच्या अमित शहांना निरोप दिला असून त्यांच्या अहंकाराचा गाडा रोखला आहे, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे. जर भाजपने त्यांची भ्रष्ट सत्ता टिकविण्यासाठी फोडाफोडीचा मार्ग स्वीकारला तर लोकांचा उद्रेक होऊन ते रस्त्यावर येईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे.
मोदी स्वतःला ईश्वर समजत होते. स्वत:ला देवाचा अवतार समजणाऱ्या नरेंद्र मोदी यांचा भारतीय जनतेने दारुण पराभव केला आहे. हा लोकशाहीने हुकूमशाही, झुंडशाहीवर मिळवलेला विजय आहे, असे म्हणावे लागेल. नरेंद्र मोदी यांचा ‘चारशे पार’चा नारा सुकलेल्या पाचोळ्यासारखा उडून गेला,अशी देखील टीका या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
पीएम मोदी आणि अमित शहा यांचा खरपूस समाचार सामनातून घेण्यात आला आहे. मोदी हे स्वतःला ईश्वराचा अवतार समजत होते. या व्यक्तीचा व्यक्तीचा दारुण पराभव भारतीय जनतेने केला असून हा लोकशाहीने हुकूमशाही, झुंडशाहीवर मिळवलेला विजय आहे. नरेंद्र मोदी यांचा ‘चारशे पार’चा नारा सुकलेल्या पाचोळ्यासारखा उडून गेला. लोक सार्वभौम आहेत हे या निकालावरून स्पष्ट झाले आहे. लोकशाहीचे संरक्षणकर्ते शेवटी सामान्य नागरिकच असतात हे भारताने दाखवून दिले. चारशे जागा निवडून द्या. नव्हे, चारशे जागा निवडून आणणारच या अहंकारास शेवटी भारतीय जनतेने पायदळी तुडवले. खुद्द वाराणसीत नरेंद्र मोदी हे सुरुवातीस पिछाडीवर पडले तेव्हा देव जागा आहे हे दिसून आले. नरेंद्र मोदी व अमित शहा या जोडगोळीने भारताचा तुरुंग केला होता. जनतेलाही मोकळेपणाने बोलण्याचे व वावरण्याचे स्वातंत्र्य नव्हते. विरोधात बोलणाऱ्यांना सरळ तुरुंगात टाकले गेले. दिल्ली, झारखंडच्या बहुमतातील मुख्यमंत्र्यांना सरळ तुरुंगात टाकणाऱ्या मोदी-शहांनी भारतीय जनता पक्षाचे ‘वॉशिंग’ मशीन केले. देशातील सर्व पक्षांतील भ्रष्ट नेत्यांना भाजपात आणून ‘आयेगा तो मोदी ही’ हा नारा देणाऱ्यांना जनतेने जागा दाखवली.
अग्रलेखात म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही हे पहिले सत्य व तथाकथित ‘एनडीए’च्या बहुमताचा आकडा काठावर आहे. म्हणजे ‘चारशे पार’च्या रथावर स्वार होऊ पाहणाऱ्या मोदी यांना रिक्षात बसून रायसिना हिलवर फिरावे लागणार आहे. देशाचे चित्र स्पष्ट झाले असून ज्या उत्तर प्रदेशात राममंदिराचे राजकारण करून मोदी स्वतःला हिंदूंचे नवे शंकराचार्य म्हणून प्रस्थापित करू पाहत होते त्या उत्तर प्रदेशात मोदी व भाजपाला मोठा हादरा बसला आहे. उत्तर प्रदेशात ८० पैकी ४० जागांवर समाजवादी पार्टी व काँग्रेसने आघाडी घेतली. अमेठीत स्मृती इराणी यांचा पराभव शेवटी राहुल गांधी यांच्या सामान्य कार्यकर्त्याने केला. रायबरेलीत राहुल गांधी स्वतः विजयी झाले. मोदी यांच्या अहंकाराचा गाडा रोखण्याचे काम शेवटी उत्तर प्रदेश व महाराष्ट्राने केले.
शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस फोडून मोदी-शहांनी घाणेरडे राजकारण केले. या घटनेमुळे महाराष्ट्रात एकतर्फी विजय मिळवता येईल हा भाजपचा भ्रमाचा भोपळा मराठी जनतेने फोडला. सत्तेचा अमर्याद वापर, पैशांचा ‘धो-धो’ पाऊस ‘मिंधे’ सेनेने पाडला. अजित पवारांनी अनेक मतदारसंघांत धमक्या दिल्या, दहशत केली. फडणवीसांनी अनाजीपंतांचे राजकारण केले. या सगळ्या कारस्थानांचा पराभव महाराष्ट्राने केला. मोदी-शहांनी मिळून महाराष्ट्रात पन्नास सभा घेतल्या, पण हाती काहीच लागले नाही. महाराष्ट्रात भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला.
सध्या दिल्लीत पुढे काय होणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. अल्पमतातल्या ‘एनडीए’चे नेतृत्व स्वीकारून मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घ्यायला पुढे जातील काय? सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप नक्कीच पुढे आला, पण त्यांच्या एनडीएचे बहुमत हे टेकूवरचे आहे व ते टेकूही डळमळीत आहेत. देशाच्या जनतेने अहंकारी मोदी व त्यांच्या अमित शहांना निरोप दिला आहे. सत्ता टिकविण्यासाठी पुन्हा भ्रष्ट मार्गाचा, फोडाफोडीचा मार्ग स्वीकारला तर लोकांचा उद्रेक रस्त्यावर येईल, असे देखील या अग्रलेखात म्हटले आहे.
संबंधित बातम्या