Kalyan Loksabha 2024 : कल्याण व ठाणे मतदारसंघावरून महायुतीतील घटक पक्ष भाजप व शिवसेनेमध्ये जोरदार रस्सीखेच झाली. अखेर कल्याण मतदारसंघ शिंदे गटाने आपल्याकडे राखण्यात यश मिळाले. हा मतदारसंघ शिवसेनेचा गड मानला जातो. येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचं वर्चस्व आहे. कल्याणमधून विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) महायुतीकडून पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
श्रीकांत शिंदेंच्या विरोधात महाविकास आघाडीकडून ठाकरे शिवसेना गटाच्या वैशाली दरेकर (Vaishali Darekar) रिंगणात आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघात (Kalyan Loksabha Constituency) ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर व श्रीकांत शिंदे यांच्यात तुल्यबळ मुकाबला होत आहे.
ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली दरेकर यांनी जोरदार प्रचार सुरू केला असून सोमवारी वैशाली दरेकर यांच्या प्रचार रॅलीत एक दृष्य पाहून शिंदे गटाचं टेन्शन वाढलं आहे. सोमवारी ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांची प्रचार रॅली काढण्यात आली होती. यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतही सहभागी झाले होते. प्रचार रॅलीत जीपमध्ये खासदार संजय राऊत आणि वैशाली दरेकर होत्या. मात्र एक व्यक्तीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्या होत्या सुलभा गायकवाड. जीपमध्ये सर्वात पुढे सुलभा गायकवाड उभ्या होत्या.
सुलभा गायकवाड या भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad ) यांच्या पत्नी आहेत. गणपत गायकवाड तेच आहेत, ज्यांनी कल्याण पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता. सुलभा देशपांडे ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकरांच्या प्रचारात सहभागी झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. याची मतदारसंघात चांगलीच चर्चा रंगली आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघात शिंदे गट आणि भाजपमध्ये प्रचंड तणाव आहे. जागावाटपाच्या चर्चेत भाजप आणि शिवसेनेतला वाद संपला नसल्याच्या चर्चा सुरु असतानाच सुलभा गायकवाड ठाकरेंच्या प्रचार रॅलीत दिसल्याने महायुतीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
यावर सुलभा गायकवाड यांनी म्हटले की, एका गावातील प्रचार फेरीत सहभागी असलो तरी आपण दरेकर यांचा प्रचार केला नाही किंवा त्यांना शुभेच्छा दिल्या नाहीत. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी भाजप समर्थक उमेदवाराचा प्रचार करणार आहे.