share market update : शेअर बाजार दरडीसारखा कोसळला! गुंतवणूकदारांची पळापळ! २० लाख कोटी बुडाले!
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  share market update : शेअर बाजार दरडीसारखा कोसळला! गुंतवणूकदारांची पळापळ! २० लाख कोटी बुडाले!

share market update : शेअर बाजार दरडीसारखा कोसळला! गुंतवणूकदारांची पळापळ! २० लाख कोटी बुडाले!

Updated Jun 04, 2024 01:26 PM IST

LS result impact on share market : लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा मोठा फटका आज शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना बसला. सेन्सेक्स, निफ्टी कोसळल्यामुळं गुंतवणूकदारांचं सुमारे २० लाख कोटींचं नुकसान झालं.

बाजार उठला! निवडणुकीचे कल पाहून गुंतवणूकदारांची पळापळ! २० लाख कोटी बुडाले!
बाजार उठला! निवडणुकीचे कल पाहून गुंतवणूकदारांची पळापळ! २० लाख कोटी बुडाले!

LS result impact on share market : लोकसभा निवडणूक निकालाच्या एक्झिट पोलनंतर खरेदीचा जोर बघणारा शेअर बाजार आज प्रत्यक्ष निकाल येऊ लागताच एखाद्या दरडीसारखा कोसळला. निवडणुकीचे कल अपेक्षेप्रमाणे येत नसल्याचं पाहून गुंतवणूकदारांनी काढता पाय घेतला. त्यामुळं सेन्सेक्समध्ये ५ हजारहून अधिक अंकांची घसरण झाली तर निफ्टी १६०० अंकांनी खाली आला. यात तब्बल २० लाख कोटींचं नुकसान झालं.

लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजाराकडं अनेकांचं लक्ष होतं. मागील काही दिवसांपासून तेजीच्या लाटेवर असलेल्या शेअर बाजारात काल मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली होती. एक्झिट पोलनं मोदी सत्ता राखणार असा अंदाज व्यक्त केल्याचा हा परिणाम होता. बहुतेक एक्झिट पोलनी भाजप आघाडीला ३५० च्या वर जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. मात्र, निकाल नेमके तसे नसल्याचं चित्र आहे.

निवडणुकीचे निकाल अपेक्षित लागत नसल्याचं दिसताच सुरुवातीपासूनच बाजारात घसरण होत गेली. अनेक शेअरना लोअर सर्किट लागलं. लाखो गुंतवणूकदारांचे पोर्टफोलिओ लालेलाल झाले आहेत.

सध्याची परिस्थिती काय?

सकाळपासून दरडीसारखा कोसळणारा बाजार दुपारी १२ नंतर काहीसा सावरल्याचं दिसत आहे. सध्या सेन्सेक्स ४ हजार अंकांनी घसरून ट्रेड करत आहे. तर, निफ्टी १३८० अंकांनी घसरलेला आहे. बँक निफ्टीलाही मोठा धक्का बसला आहे. बँक निफ्टी ३५०० हून अधिक अंकांनी घसरून ट्रेड करत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये देखील मोठी पडझड झाली आहे.

अदानी समूहाच्या शेअरमध्ये मोठी घसरण

शेअर बाजारातील आजच्या उलथापालथीचा अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर्सना मोठा फटका बसला. एक्झिट पोलनंतर अदानीच्या शेअर्सनी मोठी झेप घेतली होती. मात्र, आज हे सर्वच शेअर पुन्हा एकदा कालच्याच स्थितीत पोहोचले आहेत.

एक्सपर्ट्स म्हणतात…

एक्झिट पोलनंतर मोठ्या प्रमाणात शेअर खरेदी करणारे गुंतवणूकदार चांगलेच अडकले आहेत. भाजपप्रणित एनडीएच्या जागा ३०० च्या आत राहिल्या तर आणखी काही दिवस बाजारात पडझड सुरूच राहणार आहे. अशा परिस्थितीत या गुंतवणूकदारांनी वाट पाहणं श्रेयस्कर ठरेल, असं जाणकारांचं म्हणणं आहे. त्याचवेळी, नव्यानं गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांना ही चांगली संधी आहे.

(डिस्क्लेमर : हे वृत्त केवळ कंपनीची आणि त्याच्या शेअरच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आपल्या व्यक्तिगत सल्लागाराशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा.)

Whats_app_banner

संबंधित बातम्या