मराठी बातम्या  /  निवडणुका  /  sachin ahir : रवींद्र वायकर यांच्यावर घोटाळ्याचे आरोप करणारे किरीट सोमय्या त्यांचा प्रचार करणार का?; विरोधकांचा सवाल

sachin ahir : रवींद्र वायकर यांच्यावर घोटाळ्याचे आरोप करणारे किरीट सोमय्या त्यांचा प्रचार करणार का?; विरोधकांचा सवाल

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Apr 30, 2024 02:31 PM IST

Sachin Ahir questions kirit somaiya : रवींद्र वायकर यांना शिंदे गटाकडून लोकसभेची उमेदवारी मिळताच ठाकरेंच्या शिवसेनेनं किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे.

रवींद्र वायकर यांच्यावर घोटाळ्याचे आरोप करणारे किरीट सोमय्या त्यांचा प्रचार करणार का?; ठाकरेंच्या शिवसेनेला सवाल
रवींद्र वायकर यांच्यावर घोटाळ्याचे आरोप करणारे किरीट सोमय्या त्यांचा प्रचार करणार का?; ठाकरेंच्या शिवसेनेला सवाल

Sachin Ahir questions kirit somaiya : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून आमदार रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भूखंड घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले वायकर यांना उमेदवारी दिली गेल्यानं राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधकांनी नेमका हा मुद्दा उचलत भाजपला घेरलं आहे. वायकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे किरीट सोमय्या आता त्यांचा प्रचार करणार का,' असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय दिना पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेले असताना सचिन अहिर मीडियाशी बोलत होते. पत्रकारांनी त्यांना वायकर यांच्या उमेदवारीबद्दल विचारलं असता त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली.

'शिंदे गटानं रवींद्र वायकर यांना उमेदवारी देऊन आमच्यासाठी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील निवडणूक अत्यंत सोपी केली आहे. त्याबद्दल आम्ही मनापासून त्यांचे आभार मानतो, असं सचिन अहिर म्हणाले.

'रवींद्र वायकर ही अत्यंत चांगली व्यक्ती आहे. ते माझे चांगले मित्र आहेत. कुठल्या परिस्थितीत त्यांना पक्ष सोडून जावं लागलं हे मी सांगण्याची गरज नाही. त्यांच्या पत्रकार परिषदेत सर्वांनी पाहिल्या आहेत. मात्र, जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघात ते व्यक्ती म्हणून नव्हे तर शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडून येत होते. त्यामुळं लोकसभा निवडणुकीत आम्हाला पहिली लीड आम्हाला जोगेश्वरीतच मिळेल, असा दावा सचिन अहिर यांनी केला.

आम्ही किरीट सोमय्यांना शोधतोय!

रवींद्र वायकर यांच्यावर घोटाळ्याचे आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनीच केले होते. आता वायकर हेच महायुतीचे उमेदवार झाल्यामुळं सोमय्या पुन्हा तोंडघशी पडले आहेत. तोच धागा पकडून सचिन अहिर यांनी सोमय्यांना टोला हाणला. 'किरीट सोमय्या कुठे गेले हे आम्ही शोधतोय. सोमय्यांनी वायकर यांचे स्टार प्रचारक म्हणून पुढं यायला हवं, असं अहिर म्हणाले.

'उमेदवार मिळत नाहीत म्हणून नाइलाजास्तव शिंदे गटाला वायकर यांना उमेदवारी द्यावी लागली आहे. मुंबईतील सर्व मतदारसंघात भाजपलाही आपले आधीचे खासदार बदलावे लागले आहेत. नवीन चेहरे शोधावे लागतायत. कारण, त्यांच्या विरोधात नकारात्मक वातावरण आहे, असं अहिर म्हणाले. 'उद्या लोकसभेत पराभव झाल्यानंतर भाजपनं वायकर यांच्या विधानसभेच्या उमेदवारीला विरोध केला तर महानगरपालिकेसाठी त्यांना शुभेच्छा आहेत, अशी खोचक टिप्पणी अहिर यांनी केली.

रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरेंविरोधात बोलणार का?

आपल्याला निवडणुकांचा अनुभव आहे. अमोल कीर्तिकर नवखे आहेत असं वायकर उमेदवारी मिळाल्यानंतर म्हणाले आहेत. त्यावरही सचिन अहिर यांनी भाष्य केलं आहे. ‘विधानसभेचा त्यांना चांगला अनुभव असेलही, पण ते लोकसभेच्या प्रचारात काय बोलणार? उद्धव ठाकरे यांच्या विरोधात ते बोलू शकतील का?,’ असा सवाल अहिर यांनी केला.

WhatsApp channel