Mallikarjun Kharge : ‘देशात इंडिया आघाडीची सत्ता आल्यास गरिबांना महिन्याला १० किलो रेशन मोफत दिलं जाईल,’ अशी घोषणा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज केली.
माजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासमवेत लखनौ येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 'काँग्रेसनं देशात अन्न सुरक्षा कायदा आणला. भाजपनं काहीच केलं नाही, असा दावा त्यांनी यावेळी केला.
'आरक्षण रद्द करण्याचा प्रयत्न हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण घटनेत दुरुस्ती केल्यास मूलभूत अधिकार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरही परिणाम होईल. संविधान बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत. आम्ही पुराव्याशिवाय बोलत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीच प्रथम असं विधान केलं होतं. कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील नेतेही राज्यघटना बदलण्याबाबत बोलत आहेत, असं खर्गे म्हणाले. 'भाजपच्या मनात खरंच तसं काही नसेल तर राज्यघटनेतील बदलाबाबत चुकीची विधानं करणाऱ्या नेत्यांवर भाजप कारवाई का करत नाही, असा सवालही त्यांनी केला.
'गेल्या ५३ वर्षांत २६ पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवल्याचे मी पाहिलेले नाही. ही निवडणूक भारताच्या भवितव्यासाठी लढवली जात आहे. ही निवडणूक येणाऱ्या पिढ्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आहे. दुर्बल घटक, दलित आणि आदिवासी (आदिवासी) यांच्या हक्कांचे आणि आरक्षणाचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्य आहे. भारतीय राज्यघटनेच्या संरक्षणातच सर्वांचं रक्षण आहे. आरक्षण मिळवणारे कमी असू शकतात. पण लोकशाही वाचवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करण्याची गरज आहे, अन्यथा आपण आपलं स्वातंत्र्य गमावून बसू, असं आवाहन खर्गे यांनी केलं.
'मोदी सरकारचा घालवण्याचा पुरता बंदोबस्त इंडिया आघाडीनं केला आहे. येत्या ४ जूनला इंडिया आघाडी सरकार स्थापन करणार आहे. २०२४ ची निवडणूक म्हणजे विचारसरणीची निवडणूक आहे. ही दोन विचारसरणींची लढाई आहे. एकीकडं गरिबांसाठी लढणारे पक्ष आहेत, तर दुसरीकडं श्रीमंतांच्या बाजूनं असलेले धर्माच्या आधारे निवडणूक लढत आहेत, असा आरोप खर्गे यांनी केला.
धर्माच्या आधारे आम्ही लोकांमध्ये भेदभाव करत नाही, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाकडं लक्ष वेधलं असता खर्गे म्हणाले, ‘ते मटण, चिकन आणि मंगळसूत्राबद्दल बोलतात. हे कशाचं द्योतक आहे. नरेंद्र मोदी भाषणातूनही खोटं पसरवतात. तुमच्याकडं दोन म्हशी असतील तर काँग्रेस एक म्हैस मुस्लिमांना देईल, असं पंतप्रधान म्हणतात. तुम्हाला मतं मागायची असतील तर तुमच्या कामाच्या आधारे मागा, असं खर्गे यांनी ठणकावलं.