Priyanka Gandhi interview: 'देशभरात भाजपविरोधात लाट; मोदींनी कॉंग्रेसचा जाहीरनामा वाचून बोलावेः प्रियांका गांधी
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Priyanka Gandhi interview: 'देशभरात भाजपविरोधात लाट; मोदींनी कॉंग्रेसचा जाहीरनामा वाचून बोलावेः प्रियांका गांधी

Priyanka Gandhi interview: 'देशभरात भाजपविरोधात लाट; मोदींनी कॉंग्रेसचा जाहीरनामा वाचून बोलावेः प्रियांका गांधी

May 20, 2024 12:29 AM IST

Priyanka Gandhi interview: देशातील गोरगरीब जनता, शेतकरी, मजूर, मध्यमवर्ग केंद्रातील सत्तेला कंटाळला असून देशात भाजपविरोधात उठाव सुरू झाला आहे असे मत कॉंग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वाडरा यांनी Hindustan Times ला दिलेल्या विशेष मुलाखतीत म्हटलं आहे.

Congress general secretary Priyanka Gandhi Vadra says the alliance leaders will take a decision collectively on who will be PM if the INDIA bloc wins the polls. (Deepak Gupta/Hindustan Times)
Congress general secretary Priyanka Gandhi Vadra says the alliance leaders will take a decision collectively on who will be PM if the INDIA bloc wins the polls. (Deepak Gupta/Hindustan Times)

काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी-वाडरा देशभरात पक्षाच्या प्रचारात सध्या व्यस्त आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून त्या उत्तरप्रदेशातील रायबरेली मतदारसंघात ठाण मांडून आहेत. त्यांचे बंधू, रायबरेलीचे कॉंग्रेस उमेदवार राहुल गांधी आणि अमेठीतील कॉंग्रेस उमेदवार के.एल. शर्मा यांचा त्या प्रचार करत आहेत. या मतदारसंघात २० मे रोजी मतदान होणार आहे. प्रचाराची सांगता झाल्यानंतर प्रियांका गांधी यांनी ‘हिंदुस्थान टाईम्स’चे प्रतिनिधी प्रांशु मिश्रा यांना मुलाखत दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काँग्रेसवरील हल्ले, भाजपचा ४०० पारची घोषणा अशा विविध मुद्दावर त्यांनी चर्चा केली.

प्रश्न : लोकसभा निवडणुकीचे निम्म्याहून अधिक टप्पे पार पडले आहेत. कॉंग्रेसची प्रचार मोहीम आणि रणनीतीमध्ये तुमचा सक्रीय सहभाग आहे. आतापर्यंतच्या निवडणुकीचे तुम्ही कसे विश्लेषण करता?

-भाजपविरोधात उठाव सुरू आहे असे मला वाटते. जनतेच्या प्रचंड समस्या आहेत. मग ते गरीब असोत, शेतकरी असोत, मजूर असोत किंवा मध्यमवर्ग असोत. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे हवी आहे. राजकारण्यांनी आपण केलेल्या कृतीची जबाबदारी घ्यावी, असं लोकांना वाटते. लोकांना विकास आणि समृद्धी देणारे राजकारण हवे आहे. आतापर्यंत झालेल्या मतदानातून ही भावना मला दिसून येते.

प्रश्न : यंदा प्रचाराचे मुद्दे कोणकोणते आहेत?

- प्रचारात पूर्णपणे वेगळे मुद्दे चर्चिले जात आहे. म्हशी चोरणं, मंगळसूत्रं चोरणं याचा उल्लेख होतोय. बेरोजगारी आणि महागाईचा दर कमी करण्यासाठी काय करणार आहोत, हे ते (भाजप) सांगत नाहीत. मात्र कॉंग्रेसच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा हा जनतेसाठी काय करणार आणि लोकांना भेडसावणाऱ्या समस्या कशा दूर करणार हा आहे.

प्रश्न : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा प्रचार हिंदूंचे हक्क हिरावून घेण्याचा आणि त्यांची संपत्ती मुस्लिमांना देण्याचा काँग्रेसचा हेतू असल्याच्या आरोपांकडे वळला आहे. मंगळसूत्राचा वाद, धार्मिक आरक्षण, शुल्क इत्यादींबाबत कॉंग्रेसच्या जाहीरनाम्याची फोड करून लोकांना सांगत असल्याचं (Decode) भाजपचं म्हणण आहे? तुमची प्रतिक्रिया काय?

-माझा त्यांना (पंतप्रधान आणि भाजप नेत्यांना) सल्ला आहे की, त्यांनी आधी काँग्रेसचा जाहीरनामा वाचावा. आपण जी एखादी गोष्ट तपशीलवार वाचली असते त्याचीच फोड करू शकतो (डिकोड करू शकतो). त्यांनी (भाजप नेत्यांनी) कॉंग्रेसचा जाहीरनामाच वाचलेला नाही. आमच्या जाहीरनाम्यात नसलेल्या गोष्टींचा शोध लावणे आणि त्याची कल्पना करणे आणि एखादी गोष्ट ‘Decoding’ करणे हे खूप वेगळे असते. जाहीरनामा हा एक सार्वजनिक दस्तऐवज आहे. तरीही त्यांचे मोठे नेते जाहीरनाम्याबद्दल बेफिकीरपणे सरसकट खोटे बोलताएत, याचं आश्चर्य वाटतं. आणि ते आमच्या जाहीरनाम्यावरच सतत का बोलत आहेत? त्यांचा स्वत:चा जाहीरनामा नाही का? खोटं बोलून लोकांना भरकटवण्याव्यतिरिक्त ते जनतेला काय देत आहेत? देशातील जनतेसाठी त्यांच्या काय योजना आहेत? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हे काम केले नाही किंवा कॉंग्रेसने गेल्या ७० वर्षात हे केलं नाही, हेच त्यांना (भाजप नेत्यांना) म्हणायचे आहे.

प्रश्न : ते (भाजप नेते) असे का बोलत आहेत?

-कारण त्यांच्याकडे सांगण्यासाठी काहीच नाही. धार्मिक ध्रुवीकरणाच्या जोरावर त्यांनी यापूर्वीच्या दोन निवडणुका जिंकल्या आहेत. त्यांना वाटते तिसरी निवडणूकही तशाच पद्धतीने ते जिंकतील. लोकांना दररोज ज्या प्रकारच्या प्रचाराच्या मुद्दांना सामोरे जावे लागतेय, त्याबद्दल मला वाईट वाटतं. युट्युब, इंटरनेट, सोशल मीडिया अशा इतर माध्यमांतून मात्र लोकांना एक वेगळं सत्य पाहायला मिळतं आहे. खरं सांगायचं तर सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यातही एक सत्य असतं. सामान्य माणूस सकाळी उठतो, आपल्या मुलाच्या चांगल्या शिक्षणासाठी त्याने सर्व काही केले असले तरी मुलाला नोकरी मिळत नाही. प्रत्येक गावात बीएस्सी, बीटेक, एमएससी झालेले तरुण आहेत. प्रत्येक कुटुंबाला, मग ते कितीही गरीब असले आणि शाळा कितीही दूर असली तरी त्यांना आधी आपल्या मुलांना शिकवायचे असते. आपल्या मुलाला शिकवण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतात. यासाठी ते कर्ज घेतात. तरीही नोकरी मिळत नाही. देशात प्रचंड बेरोजगारी आणि महागाई आहे. सर्वसामान्य महिला बाजारात जाते आणि आवश्यक त्या गोष्टी विकत घेण्याचा विचार करते तेव्हा त्यातील अर्ध्या वस्तू खरेदी करण्यास ती सक्षम नसते. या काही फार महाग वस्तू नसतात. अगदी भाज्या, तेल आणि डाळी अशा वस्तू असतात. त्यांच्या समस्या सोडवल्या जाव्यात, अशी त्यांची अपेक्षा असते.

प्रश्न : अंबानी, अदानी काँग्रेसला निधी देतात, काळा पैसा देत असल्याचा आरोप पंतप्रधानांनी प्रथमच केला आहे. हा हल्ला कशासाठी?

-एखाद्या राजकीय पक्षाला काळा पैसा दिला जात आहे आणि तो पैसा टेम्पोतून नेला जात आहे, याची माहिती जर पंतप्रधानांना असेल तर त्यांनी तपास यंत्रणांना सांगून तो टेम्पो जप्त का केला नाही? या देशाने पाहिलेल्या सर्वात मजबूत पंतप्रधानांपैकी ते एक मानले जातात. मग ते आपल्या अफाट शक्तींचा वापर ही कारवाई करण्यासाठी का करत नाहीत? त्याऐवजी जाहीर सभांमध्ये ते अचानक याबद्दल ओरड का करत आहेत?

प्रश्न : भाजपच्या '४०० पार' या घोषणेवर तुमचे मत आहे का? तो प्रचार त्यांच्यावरच उलटला आहे का असं वाटतं का?

-त्यांनी आता त्याबद्दल बोलणं बंद केलं असल्याने हे त्यांनाच विचारायला हवे. मला वाटते की हे अहंकारात रुजलेले अनावश्यक अतिरेक होते. खरे तर चार टप्प्यातील मतदानानंतर '४०० पार'ची घोषणा केवळ भाजप नेत्यांच्या मुखातून नव्हे, तर मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांमधूनही चमत्कारिकरित्या गायब झाली आहे.

खरोखरच ४०० जागांचा टप्पा ओलांडला तर भारतीय राज्यघटना बदलू, असा दावा भाजपचे अनेक उमेदवार आणि नेत्यांनी केला आहे. हा दावा जनतेच्या एका मोठ्या वर्गाला चिंतेत टाकणारा आहे. भारतीय जनतेचे अधिकार राज्यघटनेत आहेत. मतदानाचा अधिकार, आरक्षणाचा अधिकार, अन्न, शिक्षण, आंदोलन सारखे अधिकार राज्यघटना देते.

या सरकारने गेल्या दहा वर्षांत लोकशाही कमकुवत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत, हे लक्षात घेता घटनात्मक मूल्ये जपण्यासाठी आणि आपल्या लोकशाहीची तत्त्वे बळकट करण्यावर विश्वास ठेवता येणार नाही. लोकशाही पद्धतीने निवडून आलेली राज्य सरकारे उलथवून टाकणे, निवडणुकीच्या वेळी दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगात डांबणे, काँग्रेस पक्षाची बँक खाती बंद करणे, खासदारांना संसदेतून बडतर्फ करणे, कायदे संमत होण्यापूर्वी त्यावर चर्चा न करणे, विरोधकांवर हल्ला करण्यासाठी सरकारी यंत्रणांचा वापर करणे अशा अनेक अ-लोकशाही कारवाया करून त्यांनी याचा पुरावा आपल्याला दाखवून दिला आहे. लोकांनी सावध राहणे हे योग्यच आहे. मोदी आणि त्यांचे सरकार अबाधित सत्ता राखण्यासाठी काहीही करू शकतात.

प्रश्न : जातीय जनगणना, बेरोजगारी, महागाई आणि कुशासन या मुद्द्यांभोवतीच भाजप आणि कॉंग्रेसचा प्रचार फिरताना दिसतो. हे मुद्दे लोकांशी जास्त निगडीत आहेत, असं तुम्हाला वाटतं?

- गरीब, शेतकरी, मध्यमवर्ग असे सगळेच जण आज संघर्ष करताना दिसत आहेत. महागाई उच्चांकी पातळीवर पोहचली असून बेरोजगारी चाळीस वर्षांतील उच्चांकी पातळीवर आहे. आज सत्तर कोटी भारतीय बेरोजगार आहेत. प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक घराला स्पर्श करणारे हे मुद्दे आहेत. त्यांच्याकडे लक्ष न देणे आणि सार्वजनिक चर्चा अकल्पनीय खालच्या आणि सोप्या पातळीवर नेऊन मतदारांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करणे हा भारतातील जनतेचा अपमान आहे.

म्हशी चोरणाऱ्या काँग्रेसच्या जाहीरनाम्याबाबत पंतप्रधान काय बोलत आहेत, ते पाहून जनता हसत आहे. सर्वसामान्य लोक एकतर हसतात किंवा रागावतात. माझे पंतप्रधान आहेत आणि त्यांच्या बोलण्याला एक विशिष्ट प्रतिष्ठा आणि स्तर असावा. ते (पंतप्रधान) आता मला हे सांगत आहेत. मी त्यांच्यावर विश्वास ठेवणार आहे का? हा विनोद आहे का? मी माझ्या मुलांना खाऊ घालू शकत नाही याचे काय? माझ्या कुटुंबातील किती लोक काम करत आहेत आणि त्यांना दोन वेळचे उदरनिर्वाह करता येत नाही याचे काय? शेतीसाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर जीएसटी लादला जात आहे. शेतकरी कर्जाच्या गर्तेत बुडालेला आहे आणि तुम्ही त्यांना अजिबात मदत करत नाही आहात, याचे काय? 

प्रश्नः पण भाजपला 'मोदी की गॅरंटी'चा विश्वास आहे. यावर तुमची भूमिका काय?

-गेल्या दहा वर्षांत मोदीजींनी जे काही आश्वासन दिले होते ते प्रत्यक्षात पूर्ण झालेले नाही. त्याच्या तथाकथित 'गॅरंटी'कडे गांभीर्याने का घ्यावे?

प्रश्न : ही निवडणूक 'आयडिया ऑफ इंडिया'ची आहे असे तुम्हाला वाटते का?

-हे नक्कीच आहे. मी म्हटल्याप्रमाणे गेली दहा वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या विचारधारेवर आधारित शासनपद्धती आपण अनुभवली आहे. लोकशाही संस्थांची मोडतोड करण्यात आली आहे. संसदेला रबर स्टॅम्प बनवले गेले आहे. त्यांच्या विचारसरणीचे प्रतिबिंब उमटविण्यासाठी शैक्षणिक अभ्यासक्रमातून ऐतिहासिक तथ्ये आणि व्यक्तिरेखा पुसल्या गेल्या आहेत. न्यायव्यवस्थेवर दबाव आहे, समाजातील विशिष्ट घटकांची बदनामी करण्यात आली आहे, लोकांमध्ये संशय आणि द्वेष पसरवला गेला आहे, प्रसारमाध्यमांना वाकवले जात आहे, सरकारी यंत्रणांचा वापर विरोधकांना त्रास देण्यासाठी केला जात आहे. प्रत्येक घटनात्मक मूल्याची पायमल्ली करण्यात आली आहे.

आज आपल्या लोकशाहीचा पाया भुसभुशीत केला जात आहे. आमची लढाई गांधीजी, नेहरूजी, सरदार पटेल आणि लाखो स्वातंत्र्यसैनिकांनी लढलेल्या राष्ट्राची, त्यांनी उभारलेल्या राष्ट्रासाठीची लढाई आहे. भारत हा एक मजबूत, स्वतंत्र, बहुभाषिक, बहुधार्मिक आणि बहुसांस्कृतिक राष्ट्र म्हणून टिकून राहिलेला संपूर्ण उपखंडातील एकमेव देश आहे. आपल्या लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष पायानेच आपल्याला भरभराट करण्यास सक्षम केले आहे.

प्रश्न : रायबरेली आणि अमेठीमध्ये उमेदवार निश्चित करण्यासाठी खूप वेळ लागला. याचे कारण काय? ही द्विधा मनस्थिती होती की रणनीती?

-खरं तर निर्णय घ्यायला अजिबात वेळ लागला नाही. आम्ही फक्त आम्हाला योग्य वेळ वाटली त्या वेळी ते जाहीर केले. हे आमच्यासाठी धोरणात्मकदृष्ट्या योग्य होते.

प्रश्न : राहुल गांधी यांनी अमेठीतून पुन्हा लढण्याची हिंमत दाखवली नाही असं भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. राहुल गांधी अमेठीऐवजी रायबरेलीतून निवडणूक का लढवत आहेत?

उत्तर : मोदीजी आता गुजरातमधून का लढले नाहीत? त्यांना भीती वाटते का? उत्तर प्रदेशात ते वाराणसीतून का लढत आहेत? राहुल गांधी यांनी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी यात संपूर्ण देशातील प्रसारमाध्यमांना इतका का रस आहे? पंतप्रधान कुठून लढत आहेत याबद्दल एक शब्दही बोलला जात नाही.

प्रश्न : तुम्ही लोकसभा निवडणूक लढवली नाही यामागे काय कारण आहे?

-रायबरेली, अमेठी या मतदारसंघाशी आमचं कौटुंबिक नातं आहे. आम्ही येथे वर्षानुवर्षे काम करत आहोत. आम्ही त्यांच्या घरी यावे अशी जनतेची अपेक्षा असते. त्यांच्यात आपणही असावे, अशी त्यांची अपेक्षा असते. मी इथे १५ दिवसांपासून आहे. त्यामुळे हा अत्यंत व्यावहारिक निर्णय होता. आम्ही दोघेही (प्रियांका आणि राहुल गांधी) देशभर प्रचार करत होतो. आम्हा दोघांना निवडणूक लढवायची असेल तर आम्हा दोघांनाही इथे येऊन सगळ्यांना भेटावं लागेल. खरं सांगायचं तर तसं व्हायला हवं होतं. त्यामुळे आम्ही ठरवलं की, आपल्यापैकी एक जण देशात प्रचार सुरू ठेवेल आणि साहजिकच ते राहुल असतील आणि मी या दोन निवडणुका पाहत आहे.

प्रश्न : पण तुम्ही अमेठीची लढाई तुम्ही विरुद्ध ती (स्मृती इराणी) अशी केली आहे.

-असं नाही. ही लढाई भाजप उमेदवार आणि कॉंग्रेस उमेदवार किशोरीलाल शर्मा यांच्यात आहे. मला विश्वास आहे की शर्मा जिंकतील.

प्रश्न : भाजपकडून तुमच्या कुटुंबावर, विशेषत: तुमचे दिवंगत वडील आणि आजीवर वैयक्तिक हल्ले झाल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देण्यात तुम्ही आघाडीवर आहात. तुमची प्रतिक्रिया राजकीय आहे की वैयक्तिक आणि भावनिक?

-खरं तर वडील आणि आजीवर राजकीय हल्ले होत असताना मला अजिबात वेदना होत नाही. कारण जेव्हा आपण ज्याच्यावर खूप खोलवर प्रेम करतो, त्याचे बलिदान पाहतो, जेव्हा आपण त्यांना स्वतःपेक्षा मोठ्या गोष्टीसाठी गमावतो, ते एक विनाशकारी पण सत्य आहे. ते तुमच्यासाठी कुणीही पुन्हा परिभाषित करू शकत नाही. त्यांना हवं ते सगळं ते बोलू शकतात, माझ्यावर त्याचा काही परिणाम होत नाही.

त्यांना दिलेली माझी प्रतिक्रिया ना राजकीय आहे, ना वैयक्तिक. वैयक्तिक हल्ले हे राजकीय कमकुवतपणाचे लक्षण आहे असे मला वाटते. मोदीजी हे सत्तेमागे लपून खोटे बोलणारे कमकुवत पंतप्रधान आहेत. त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने गेली अनेक वर्षे माझ्या कुटुंबाची बदनामी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी देऊन मोहीम राबविली आहे. यात सत्य काय आहे तेही सांगायला हवं असं मला वाटतं.

सत्य हे स्वतःहून बोलेल असा माझ्या आई-वडिलांचा आणि माझ्या आजीचा विश्वास होता. त्यांच्याबद्दल पसरवल्या जाणारा खोटेपणा आणि अपप्रचारापासून बचाव करण्यासाठी त्यांना बोलण्याची गरज नाही. राष्ट्राप्रती असलेले कर्तव्य आणि त्यांनी जपलेल्या मूल्यांवर त्यांचा विश्वास होता.

या बाबतीत मी त्यांच्यापेक्षा थोडी वेगळी आहे. मला असे वाटते की आजच्या जगात खोटेपणाला सत्याचा जोरदार प्रतिकार करावा लागतो. कारण आपल्या आजूबाजूला इतका कोलाहल असतो की काय खरे आहे आणि काय नाही याकडे दुर्लक्ष करणे सोपे जाते.

आम्ही सतत गप्प बसून भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि प्रसारमाध्यमांमधील त्यांच्या मित्रांना आमच्याबद्दल एकप्रकारे पूर्णपणे खोटा प्रचार करण्याची परवानगीच दिली होती. मला असे वाटते या गोष्टीला खोडून काढणे महत्वाचे आहे.

प्रश्न : पंतप्रधान मोदी हे तुमच्या भावाला मोदी नेहमी 'शहजादा' म्हणून संबोधतात. मुद्दा घराणेशाहीचा आहे. त्यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे ?

- तथाकथित राजकीय घराण्यांतील अनेक मुले, मुली, पुतणे-पुतण्या यांना स्वत:च्या पक्षात घेऊन ती उणिव भरून काढण्यासाठी त्यांनी आपले विचार शिथिल केलेले दिसतात. इतर कोणत्याही पक्षापेक्षा आता भाजपमध्ये जास्त घराणेशाही आहे असे मला वाटते. त्यांच्या बोलण्याला काहीच किंमत उरलेली नाही ही पंतप्रधानांची अडचण आहे. ते बोलतात ते जसं काही प्रमाणात इतर पक्षांना लागू होतं तसंच त्यांना स्वत:ला आणि त्यांच्या पक्षालाही चपखलपणे लागू होते.

प्रश्न : कॉंग्रेस आता आक्रमकपणे प्रचार करत आहे. राहुल गांधी म्हणतात की उत्तर प्रदेशात 'इंडिया' आघाडीचे वादळ आहे. निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये काय परिस्थिती आहे?

- निवडणुका जसजशा पुढे सरकत आहेत, तसतसा एक अंतःप्रवाह (undercurrent) मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे असे मला वाटते. आमची आघाडी अतिशय प्रभावीपणे आणि एकजुटीने काम करत आहे. उत्तर प्रदेशातील निकाल आमच्यासाठी खूप सकारात्मक येतील, असे मला वाटते.

प्रश्न : ४ जून रोजी ‘इंडिया’ आघाडीचा विजय झाल्यास राहुल गांधी हे इंडिया आघाडीतील सर्वात मोठ्या पक्षाचे नेते म्हणून पंतप्रधान होतील का?

- अशी परिस्थिती निर्माण झाल्यास ‘इंडिया आघाडी’चे नेते एकत्रितपणे हा निर्णय घेतील.

प्रश्न : काँग्रेस-सपा युती हिट झाली असून ती २०२७ मध्येही कायम राहील, असे आपल्या पक्षातील आणि सपाचे नेते सांगत आहेत. तुम्हालाही असंच वाटतं का?

-मी म्हटल्याप्रमाणे एक आघाडी म्हणून आम्ही खूप चांगले काम करत आहोत. जमिनीवरही आमचे सर्व कार्यकर्ते त्यांच्याकडे जे काही आहे ते पणाला लावत आहेत. मला विश्वास आहे की यामुळे आम्हाला यश मिळेल.

Whats_app_banner

संबंधित बातम्या