Vijay Shivtare slams Ajit Pawar : पवार विरुद्ध पवार अशा संघर्षानं चर्चेत असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha Election) आता माजी मंत्री विजय शिवतारे यांनी शड्डू ठोकला आहे. बारामतीमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची घोषणा त्यांनी केली असून त्यावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन त्यांनी अजित पवारांवर सडकून टीका केली. 'अजित पवारांनी सभ्यतेची नीच पातळी गाठली आहे, असा घणाघात त्यांनी केला.
शिवतारे आणि अजित पवार यांचं राजकीय वैर सर्वश्रुत आहे. २०१९ च्या निवडणुकीत अजित पवार यांनी शिवतारे यांंना ठरवून पाडलं होतं. त्यामुळं शिवतारे संतापले आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर शिवतारे शिंदे गटात गेले आहेत. अजित पवारही महायुतीत आल्यामुळं त्यांनी सुरुवातीला जुळवून घेतलं होतं. मात्र अजित पवारांची गुर्मी कायम असल्यामुळं आता इलाज नाही, असं त्यांनी आज स्पष्ट केलं.
'२०१९ च्या निवडणुकीत मी त्यांच्या मुलाविरोधात प्रचार केला होता. मात्र त्यात वैयक्तिक काही नव्हतं. तो राजकारणाचा भाग होता. मात्र, त्यावेळी अजित पवारांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन माझ्यावर टीका केली होती. माझ्या तब्येतीची खिल्ली उडवली होती. माझ्या गाडीच्या नंबरपासून ती कोणत्या कंपनीची आहे याची माहिती काढण्यापर्यंत ते गेले होते. मी त्यांना माफ केलं होतं. ते महायुतीत आल्यानंतर त्यांना भेटलो, त्यांचा सत्कार केला. मात्र त्यांच्यात बदल झालेला नाही, असा आरोप शिवतारे यांनी केला.
‘बारामतीमध्ये अजित पवार यांच्या विरोधात राग आहे. अजित पवार उर्मट आहेत. त्यांना मतदान करणार नाही असं लोकांचं म्हणणं आहे. काही लोकांना सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार दोन्ही नको आहेत. त्यामुळं लोकशाहीतील पर्याय म्हणून मी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. पुरंदरच्या लोकांना अजित पवारांचा बदला घ्यायचा आहे. हे माझं मत नाही. बदला नियती घेईल,’ असंही शिवतारे म्हणाले.
लोकशाहीला मानणाऱ्या, घराणेशाही आणि साम्राज्यशाहीला न मानणाऱ्या सर्वसामान्य मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून मी लढणार. पवार विरुद्ध बारामतीमधील सर्वसामान्य माणूस अशी ही लढाई असेल. अजित पवारांनी सर्वांना त्रास दिला आहे. पुण्यात दुसरा कुणीही मोठा होऊ नये अशी यांची मानसिकता आहे. ही मानसिकता मोडून काढली पाहिजे, असं शिवतारे म्हणाले.
‘मी जे काही करतो ते लोकांसाठी करतो आहे. ही बंडखोरी नाही. न्यायाची लढाई आहे. याआधीही कुणीतरी विरोधात लढायचे. आज पवार विरुद्ध पवार आहेत. मग ज्यांना पवारांना मत द्यायचं नाही त्यांनी जायचं कुठं?,’ असा प्रश्न विजय शिवतारे यांनी केला. 'नमो विचार मंच' या नावाखाली ही निवडणूक आम्ही लढणार आहोत,' असं शिवतारे म्हणाले.