Sonia Gandhi on Lok Sabha Election results 2024 : लोकसभा निवडणुकीचे निकाल एक्झिट पोलमध्ये दाखविलेल्या निकालांच्या नेमके उलट असतील, असा विश्वास काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी सोमवारी व्यक्त केला.
लोकसभा निवडणूक २०२४ चे निकाल उद्या, ४ जून रोजी लागणार आहेत. मागचा दीड महिनाभर या निवडणुकीसाठी सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या आघाडीनं देश ढवळून काढला. शेवटच्या टप्प्याचा प्रचार संपल्यानंतर मतदानोत्तर चाचण्यांचे निकाल जाहीर झाले. त्यातील बहुतेक सर्व एक्झिट पोलचे अंदाज सत्ताधारी भाजपच्या बाजूनं आहेत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणित आघाडी ३५० च्या वर जागा जिंकून सत्तेची हॅटट्रिक करेल, असा अंदाज एक्झिट पोलमधून व्यक्त झाला आहे. त्यामुळं भाजप समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मात्र, विरोधी पक्षांनीही आशा सोडलेली नाही.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या बोलण्यातून हेच दिसून आलं. मीडियाच्या प्रतिनिधींनी सोनिया गांधी यांना निकालाबाबत विचारलं. त्यावर त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. ‘निकालांसाठी आपल्याला थोडं थांबावं लागेल, फक्त थांबा आणि बघा. एक्झिट पोलमधून जे काही निकाल आलेत, त्याच्या नेमके उलट निकाल आपल्याला पाहायला मिळतील. आम्ही खूप आशावादी आहोत,’ असं सोनिया म्हणाल्या.
मतदानाच्या प्रत्येक टप्प्यागणिक आत्मविश्वास उंचावलेल्या इंडिया आघाडीला देशात सत्तांतर होईल असा विश्वास आहे. काँग्रेसनं घेतलेल्या एक्झिट पोलमध्ये इंडिया आघाडीला २९५ जागा मिळत असल्याचं समोर आलं आहे.
विरोधी पक्षाच्या नेत्यांनी चॅनेल व विविध संस्थांच्या एक्झिट पोलवर टीका केली आहे. ‘हे पोल मोदी मीडिया पोल आहे,’ अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. तर, शेअरचे भाव पडू नये म्हणून एक्झिट पोलवाल्यांकडून हे अंदाज वर्तवून घेण्यात आले आहेत, असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
एक्झिट पोल हे वृत्तवाहिन्यांचा टीआरपी वाढवण्यासाठी असतात. ते विश्वासार्ह मानण्याचं कारण नाही. राज्यात महाविकास आघाडीला ३२ जागा मिळतील, असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
संजय राऊत यांनी एक्झिट पोलवर खरमरीत टीका केली आहे. हा एक्झिट पोल अत्यंत फ्रॉड आहे. गेल्या काही वर्षांमध्ये हे पोल चुकीचे ठरत आले आहेत. या सगळ्यावर गृहमंत्रालयाचा प्रभाव असतो हे सगळ्यांना माहीत आहे,' असं संजय राऊत म्हणाले. भाजपच्या ४०० पारच्या दाव्याचीही त्यांनी खिल्ली उडवली. भाजपला ८०० जागाही मिळू शकतात, असा टोला त्यांनी हाणला.