उद्धव ठाकरेंची आज सोलापुरात काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. यात त्यांनी पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली. काय ती छाती, काय ती दाढी, म्हणे एक अकेला सबपे भारी, पण आता आजूबाजूला भ्रष्टाचारी, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला आहे.
उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारवर टीकास्त्र सोडत सोलापूर मतदारसंघात केवळ मताधिक्य नको तर समोरच्या उमेदवाराचं डिपॉजिट जप्त करून निवडून द्या, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी सोलापूरकरांना केलं आहे.
द्धव ठाकरे म्हणाले, मोदीजी तुम्हाला आमची देशाभिमानी कडवट शिवसेना नकोय, तुम्ही कुणाचा प्रचार करताय, तुम्हाला माहिती आहे का? २०१४ व २०१९ मध्ये मोदींबद्दल आम्हालाही अभिमान होता. काय ती छाती, काय ती दाढी, एक अकेला सबपे भारी, असं होतं. पण आता एक अकेला सबपे भारी, आजूबाजूला भ्रष्टाचारी, असं वातावरण आहे. सर्व भ्रष्टाचारी तुमच्या पक्षात आले आहेत.
आमचं हिंदुत्व आमचं राष्ट्रीयत्व आहे. जो या देशाला आपलं मानतो, तो आमचा आहे, अशी शिवसेना यांना नकोय, यांना ही नकली शिवसेना वाटतेय. भारतातील सर्वात मोठं सेक्स सँकडल, प्रज्वल रेवण्णा, देवेगौडा यांचा नातू त्यांचे यांचे हजारो सेक्स स्कँडल व्हिडीओ व्हायरल झाले आहेत आणि मोदीजी सांगत आहेत, या प्रज्ज्वलला मत दिल्यास माझे हात बळकट होतील. या कळकट हातांनी तुमचे बळकट हात होणार आहेत. अशी टीका ठाकरेंनी केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले महाराष्ट्राच्या साध्या माणसाने लिहिलेली घटना तुम्ही बदलायला निघालेला आहात. भाजपात हिंमत असेल, तर ज्या घटनेवर तुम्ही हात ठेवून शपथ घेतला. त्या घटनेला हात लावून पाहा संपूर्ण देश पेटल्याशिवाय राहणार नाही. मात्र त्यांना घटना का बदलायची आहे? कारण यांच्या मनात महाराष्ट्राबद्दल आकस आहे, त्यांना महाराष्ट्रातील शिवसेना संपवायची आहे. शिवसेनेला नकली म्हणालयला ती काय तुमची डिग्री नाही.
भाजप म्हणते मोदींनी लस दिली म्हणून आपण जिवंत राहिलो. लस द्यायला मोदी काय शास्त्रज्ञ आहेत का? कोरोनाची लस महाराष्ट्रात बनली याचा मला अभिमान आहे. महाराष्ट्रच्या आरोग्य यंत्रणेने लोकांना लस पोहोचवली. मोदींनी लस देण्यासाठी काय काय केलं? आम्हाला मागितलं तर म्हणायचे यांना द्यायचे, त्यांना द्यायचे, प्रत्येक वेळी हेच चाळे केले, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदींवर जोरदार टीका केली.