Stage collapsed in rahul gandhi Rally : लोकसभा निवडणुकीचे सहा टप्पे पार पडले असून राजकीय नेते आता मतदानाच्या अखेरच्या टप्प्यातील प्रचारात व्यस्त आहेत.आज पाटण्यातील पालीगंज येथे इंडिया आघाडीची सभा पार पडली. या सभेत राहुल गांधी,तेजस्वी यादव यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. ज्यावेळी राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि तेजस्वी यादव (tejashwi yadav) तसेच इंडिया आघाडीचे अन्य नेते स्टेजवर पोहोचले अचानक स्टेज कोसळू लागला. राहुल गांधी स्टेजवर मध्यभागी उभे असतानाच स्टेज कोसळला.या सभेसाठी आरजेडीचे नेते तेजस्वी यादव, व्हीआयपीचे मुकेश सहनी आणि भाकपचे दीपांकर भट्टाचार्य उपस्थित होते. मात्र मोडलेल्या मंचाची दुरुस्ती करून सभा पुन्हा सुरू करण्यात आली.मात्र यात कोणालाही दुखापत झाली नाही. स्टेज कोसळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्यासपीठ कोसळताना तेथे उपस्थित असलेल्या लालू यादव यांच्या कन्या मीसा भारती यांनी राहुल गांधी यांचा हात पकडून त्यांना आधार दिला. दरम्यान सुरक्षा रक्षकही राहुल गांधी यांच्याजवळ पोहोचला. मात्र राहुल गांधी त्यांना म्हणत आहेत की, ते एकदम ठीक आहेत. दरम्यान तेजस्वी यादव यांना मंचावरील दुसरे नेते आधार देताना दिसून आले. पालीगंजच्या सभेआधी राहुल गांधी यांनी पाटणा यथील बख्तियारपूर येथील सभेला संबोधित करताना भाजप व पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दावा केला की, जर ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लूसिव अलायन्स' (‘इंडिया') सत्तेत आली तर अग्निपथ योजना रद्द केली जाईल. त्याचबरोबर प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात प्रति माह ८,५०० रुपये जमा केले जातील. राहुल गांधी म्हणाले की, जर लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया' आघाडीचे सरकार आले तर जुलै महिन्यापासून प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात ८,५०० रुपये जमा केले जातील. यामुळे प्रत्येक कुटूंबाची आर्थिक स्थितीत सुधारेल.
बख्तियारपूर येथील सभेत राहुल गांधींनी म्हटले की, नरेंद्र मोदी सरकारचा प्रयत्न आहे की, देशात पुन्हा राजेशाही आणली जाईल. या लोकांची इच्छा आहे की, एससी,एसटी आणि ओबीसींचे अधिकार हिरावून घेतले जावेत. नरेंद्र मोदींनी देशातील २२ ते २५ लोकांना महाराजा बनवले आहे. त्यांची नावे आहेत अदानी व अंबानी. नरेंद्र मोदी यांच्यासाठी काम करतात. या लोकांचे १६ लाख कोटी रुपये माफ केले आहेत.