मराठी बातम्या  /  elections  /  Modi Ka Parivar : 'मैं हूं चौकीदार’ नंतर आता ‘मोदी का परिवार', अमित शहा, गडकरींसह BJP नेत्यांनी का बदलले X वरील बायो?

Modi Ka Parivar : 'मैं हूं चौकीदार’ नंतर आता ‘मोदी का परिवार', अमित शहा, गडकरींसह BJP नेत्यांनी का बदलले X वरील बायो?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 04, 2024 03:21 PM IST

Lok Sabha Election 2024 : लालू प्रसाद यादव (lalu prasad yadav) यांनी मोदींच्या कुटूंबावरून टीका केल्यानंतर भाजपने प्रचाराची नवी मोहीम सुरू केली आहे. भाजपच्या प्रमुख नेत्यांनी आपल्या एक्स बायोमध्ये मोदी का परिवार हे तीन शब्द जोडले आहेत.

भाजपकडून मोदी क परिवार मोहीम सुरू
भाजपकडून मोदी क परिवार मोहीम सुरू

Modi ka Parivar: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भारतीय जनता पार्टी (बीजेपी) चे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी व मंत्र्यांनी सोमवार (४ मार्च, २०२४) अचानक सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्सवर प्रोफाइलच्या बायोमधील माहिती अपडेट केली आहे. दुपारच्या सुमारास या नेत्यांच्या एक्स हँडल्सवर नावाच्या समोर 'मोदी का परिवार' शब्द जोडला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेलंगणामध्ये सभेत राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे. माझ्या कुटुंबावरुन माझ्यावर निशाणा साधला जात आहे. मात्र आता संपूर्ण देश सांगतोय की मी मोदीच्या कुटुंबातील आहे. पंतप्रधान मोदींच्या या घोषणेनंतर आता अनेक केंद्रीय मंत्र्यांनी सोशल मीडियावर आपल्या नावात बदल करत त्यामध्ये मोदींच्या नावाचा समावेश केला आहे.

काय म्हणाले होते लालू यादव –

रविवारी पाटण्यात आयोजित इंडिया आघाडीच्या सभेत बोलताना बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव पंतप्रधान मोदींवर व्यक्तिगत टीका केली होती."कोण आहेत मोदी? मोदी कोणीच नाही. मोदींकडे तर त्यांचं कुटुंबही नाही. तुमच्या कुटुंबात कोणतंही मूल का नाही? जास्त मुलं असलेल्यांना बोलतात की परिवारवाद करतात. कुटुंबासाठी लढतात, मोदीतर हिंदूच नाही, असं लालू प्रसाद यादव म्हणाले होते.

यानंतर भारतीय जनता पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी आणि मंत्र्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांच्या नावापुढे तीन अक्षरं जोडली आहेत. “मोदी का परिवार” असं लिहिलं आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या नेत्यांकडून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपच्या सर्व मंत्र्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटच्या नावामध्ये बदल केला आहे.

मोदी म्हणाले की, १४० कोटी देशवासीय माझे कुटूंब आहे. हे तरुण माझे कुटूंब आहे. देशातील कोट्यवधी मुली, माता व भगिनी माझे कुटूंब आहे. देशातील प्रत्येक गरीब माझे कुटूंब आहे. ज्यांचे कोणी नाही ते मोदीचे आहेत आणि मोदी त्यांचा आहे. हा भारतच माझे कुटूंब आहे.

'मैं हूं चौकीदार' प्रमाणे मोदी परिवार पॅटर्न -

एक्सवर भाजप नेत्यांनी मोदी का परिवार नावाचा वापर निवडणुकीच्या तोंडावर सुरू केला आहे. राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, एप्रिल मे महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप "मोदी के परिवार" नारा घेऊन मतदारांना सामारे जाण्याची शक्यता आहे.

WhatsApp channel