मराठी बातम्या  /  निवडणुका  /  महायुतीचा दक्षिण मुंबईचा उमेदवार ठरला! मालमत्ता जप्त झालेले यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव यांना उमेदवारी

महायुतीचा दक्षिण मुंबईचा उमेदवार ठरला! मालमत्ता जप्त झालेले यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव यांना उमेदवारी

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Apr 30, 2024 06:16 PM IST

Yamini Jadhav : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या शिंदे गटानं आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

महायुतीचा दक्षिण मुंबईचा उमेदवारही ठरला! ईडीच्या रडारवर असलेले यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव यांना उमेदवारी
महायुतीचा दक्षिण मुंबईचा उमेदवारही ठरला! ईडीच्या रडारवर असलेले यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव यांना उमेदवारी

Yamini Jadhav : गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये सुरू असलेला दक्षिण मुंबई लोकसभा (South Mumbai Lok Sabha) मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा अखेर सुटला आहे. महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वाट्याला आली असून तिथून आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामिनी जाधव यांची लढत ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांच्याशी होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघावरून भाजप व शिंदे गटामध्ये रस्सीखेच सुरू होती. भाजपनं ही जागा लढवण्याची तयारी सुरू केली होती. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तिथून तयारी देखील सुरू केली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी भाजप नेतृत्वाकडून त्यांना प्रचार थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तेव्हाच ही जागा शिंदे गटाकडं जाणार अशी चर्चा होती. शिंदे गटाकडून मिलिंद देवरा व यामिनी जाधव यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, अखेर यामिनी जाधव यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे.

यामिनी जाधव या सध्या भायखळा विधानसभेच्या आमदार आहेत. त्यांनी नगरसेवक म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. २०१२ साली पहिल्यांदा त्या मुंबई महापालिकेत नगरसेविका म्हणून निवडून आल्या. महापालिकेच्या विविध समित्यांवर त्यांनी काम केलं. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं त्यांना आमदारकीचं तिकीट दिलं. मुस्लिमबहुल असलेल्या या मतदारसंघातून यामिनी जाधव यांनी बाजी मारली. त्यांनी एमआयएमचे वारिस पठाण यांचा पराभव केला.

कोण आहेत यामिनी जाधव?

यामिनी जाधव या यशवंत जाधव यांच्या पत्नी आहेत. यशवंत जाधव यांनी मुंबई महापालिकेत अनेक वर्षे स्थायी समिती अध्यक्षपद भूषवलं होतं. जाधव यांनी कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा व मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप भाजपचे किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर ईडीचा ससेमिरी यशवंत जाधव यांच्या मागे लागला. त्यांच्या मालमत्तांवर तब्बल चार दिवस छापे सुरू होते. जाधव यांनी अनेक बनावट कंपन्या उघडल्या होत्या. तसंच, मुंबईत अनेक मालमत्ता खरेदी केल्याचं समोर आलं होतं. त्यांच्या नावे मुंबईत असलेले ३० ते ४० फ्लॅट प्राप्तिकर खात्यानं जप्त केले होते.

यशवंत जाधव शिंदे गटात गेले आणि…

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडून भाजपसोबत घरोबा केल्यानंतर यशवंत शिंदे यांनी शिंदेंना साथ दिली. गुवाहाटीला जाणाऱ्या आमदारांच्या पहिल्या यादीत यामिनी जाधव होत्या. त्यानंतर यशवंत जाध यांच्या विरोधातील चौकशी थांबली होती. यामिनी जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकाही केली होती.

WhatsApp channel