Madha Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचे मतदान जसजसे जवळ येत आहे, तसतशी राजकीय डावपेचांना धार आली आहे. महादेव जानकर यांना आपल्या गोटात खेचून महायुतीनं टाकलेला डाव शरद पवार यांनी उधळून लावला आहे. शरद पवार यांनी भाजपचे दिग्गज नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनाच गळाला लावलं आहे. मोहिते पाटील हे लवकरच पवारांच्या उपस्थितीत तुतारी हाती घेणार आहेत.
महायुतीमध्ये लोकसभेच्या ज्या जागांवरून वाद सुरू होते, त्यात माढ्याची जागा प्रमुख होती. तिथं भाजपनं रणजित निंबाळकरांना पुन्हा संधी दिली आहे. निंबाळकरांच्या उमेदवारीमुळं अकलूजमधील दिग्गज पुढारी मोहिते पाटील हे कमालीचे नाराज झाले होते. निंबाळकरांच्या उमेदवारीचा फेरविचार करण्याची मागणी त्यांनी केली होती. मात्र, पक्षानं त्याकडं दुर्लक्ष केलं.
हा वाद सुरू असतानाच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं महादेव जानकर यांना माढ्यातून उतरवण्याची तयारी केली होती. मोहिते-पाटील आणि निंबाळकर यांच्या वादाचा फायदा घेत आणि माढ्यातील धनगर मतं घेत खेचून ही जागा काढण्याचा शरद पवारांचा प्रयत्न होता. मात्र, महायुतीनं रातोरात जानकर यांना गळाला लावलं. त्यामुळं पवारांच्या पक्षावर नव्या उमेदवाराचा शोध घेण्याची वेळ आली होती.
हा शोध घेत अखेर मोहिते पाटलांपाशी येऊन थांबला आहे. पवारांच्या पक्षाचे नेते खासदार अमोल कोल्हे यांनी नुकतीच मोहिते पाटील यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीत माढ्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. कोल्हे यांनी पवारांचा निरोप मोहिते पाटलांना दिला. पवारांच्या पक्षात गेल्यास धैर्यशील मोहिते पाटलांना लोकसभेच्या रिंगणात उतरवणं सहज शक्य होईल हे मोहिते-पाटलांच्या लक्षात आलं आणि तिथंच पक्षांतरावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जातं.
विजयसिंह मोहिते पाटील हे लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. मोहिते पाटील यांच्या कुटुंबातील महत्त्वाच्या व्यक्तींची उद्या मुंबईत बैठक होणार असून त्यानंतर दोन-चार दिवसांत प्रवेश होणार आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह मोहिते पाटील यांनी ही माहिती दिली. तसं झाल्यास धैर्यशील मोहिते-पाटील हे माढ्यातून महाविकास आघाडीचे उमेदवार असतील हे निश्चित मानलं जात आहे.
विजयसिंह मोहिते पाटील हे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. शरद पवारांच्या विश्वासातील म्हणून ते ओळखले जात होते. अकलूज तालुक्यासह सोलापूरच्या काही भागांत मोहिते-पाटील घराण्याचा मोठा दबदबा आहे. राज्यात व केंद्रात २०१४ साली सत्ताबदल झाल्यानंतर ते भाजपमध्ये गेले होते. आता पुन्हा एकदा ते मूळ पक्षात परतणार आहेत. त्यांच्या पक्षांतरानं माढ्यातील राजकीय गणितं पुन्हा बदलणार आहेत.