solapur lok sabha constituency : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज सकाळपासून मतदान सुरू आहे.सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाबरोबरच (Lok sabha Election) राज्यातील ११ मतदारसंघात आज सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. उष्णतेच्या लाटेमुळे सकाळच्या वेळी मतदानासाठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळालं. पहिल्या एक तासातच सोलापूर लोकसभेसाठी १२ टक्के तर माढा लोकसभेसाठी १० टक्के मतदान झाले होते. मतदान प्रक्रिया सुरुळित सुरू असतानाच सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथे एक खळबळजनक घटना घटली आहे. मतदानासाठी आलेल्या एका तरुणाने ईव्हीएम मशीनवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. यामुळे मतदान केंद्रावर चांगलीत पळापळ झाली.
ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव दादासाहेब तळेकर आहे. या तरुणाने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संतप्त होत ईव्हीएम पेटवल्याची माहिती समोर आली आहे. मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांनी संबंधित तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. मतदान अधिकाऱ्याने सांगितले की, यामुळे मतदान प्रक्रियेवर कोणताही परिणाम झालेला नाही. ईव्हीएम पूर्णपणे जळालं असून नवीन ईव्हीएम आणून मतदान प्रक्रिया पुन्हासुरूकेली गेली.
घटनास्थळावरूनमिळालेल्या माहितीनुसार, बागलवाडी गावातील मतदान केंद्रावरील ईव्हीएममध्ये (EVM) तांत्रिक बिघाड झाला होता. त्यानंतर तेथे ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न झाला. दादासाहेब तळेकर दुपारच्या सुमारास मतदानासाठी आला होता. त्यावेळी त्याने आपल्या खिशातून पेट्रोलची छोटी बाटली सोबत नेली होती. आत गेल्यानंतर त्याने ईव्हीएमवर पेट्रोल टाकून त्याला आग लावली. यामुळे ईव्हीएम पूर्णपणे खराब झाले असून नवीन मशीन आणून या केंद्रावर फेरमतदान केले जात आहे. या गावात साधारण १३०० मते असल्याचं सांगितलं जात आहे. तेथे ५० ते ६० टक्के मतदान झालं होतं. त्यानंतर हा प्रकार घडला.
या घटनेनंतर बागलवाडी येथे मतदान प्रक्रिया थोडा वेळ थांबवली होती. या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे आणि महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांच्यात लढत होत आहे.
रायगड व कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली असून येथे मतदान करण्यासाठी गेलेल्या दोन मतदाराचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातील किंजळोली बुद्रुक येथे उष्माघाताने एकाचा मृत्यू झाला तर कोल्हापूरमध्ये मतदान केंद्राबाहेरच ६१ वर्षीय वृद्धाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला.