shirur lok sabha : अमोल कोल्हेंच्या विरोधात अजित पवारांचा उमेदवार ठरला! मोठी टक्कर होणार
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  shirur lok sabha : अमोल कोल्हेंच्या विरोधात अजित पवारांचा उमेदवार ठरला! मोठी टक्कर होणार

shirur lok sabha : अमोल कोल्हेंच्या विरोधात अजित पवारांचा उमेदवार ठरला! मोठी टक्कर होणार

Mar 20, 2024 02:41 PM IST

Shirur Lok Sabha Election 2024 : पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवारांच्या पक्षाला अखेर अमोल कोल्हे यांच्या विरुद्ध उमेदवार सापडला आहे.

अमोल कोल्हेंच्या विरोधात अजित पवारांचा उमेदवार ठरला! मोठी टक्कर होणार
अमोल कोल्हेंच्या विरोधात अजित पवारांचा उमेदवार ठरला! मोठी टक्कर होणार

Shirur Lok Sabha Election : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांच्या उमेदवार निश्चितीला वेग आला आहे. राजकीय प्रतिष्ठेशी संबंध असलेल्या काही जागांवर तगडे उमेदवार देण्याचा महायुती व महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या अजित पवार गटानं चालवलेला तगड्या उमेदवाराचा शोध अखेर संपला आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरूरमधून अमोल कोल्हे यांना आव्हान देणार हे जवळपास निश्चित झालं आहे.

शिवसेना-भाजप युतीच्या काळात शिरूर मतदारसंघ शिवसेनेकडं होता. शिवाजीराव आढळराव पाटील हे तीन वेळा इथून निवडून आले होते. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी आढळरावांना पराभवाची धूळ चारली. त्यानंतरही ते मतदारसंघात सक्रिय राहिले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अमोल कोल्हे हे आपल्याकडं येतील असा अजित पवारांचा होरा होता. मात्र कोल्हे हे शरद पवारांशी निष्ठावंत राहिले. त्यामुळं अजित पवारांनी त्यांना पराभूत करण्याचा निर्धार केला आहे.

हा मतदारसंघ शिंदे यांच्या शिवसेनेकडं असल्यानं शिवाजीराव आढळराव पाटील यांनी इथून निवडणुकीची तयारी केली होती. निवडणूक लढण्यावर ते ठाम होते. मात्र, अजित पवारांच्या गटानंही या मतदारसंघावर दावा ठोकला होता. त्यामुळं महायुतीत पेच निर्माण झाला. अजित पवारांनी हा मतदारसंघ मिळवला खरा, पण कोल्हे यांच्या विरोधात त्यांच्याकडं तगडा उमेदवार नव्हता. त्यामुळं शिवाजारीव आढळराव पाटलांनाच राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभे करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यानंतर ते प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. अमोल कोल्हे यांना आढळराव जोरदार टक्कर देतील असं मानलं जात आहे.

दिलीप मोहिते पाटील यांची नाराजी दूर

आढळराव पाटलांना राष्ट्रवादीतून उमेदवारी देण्यास दिलीप मोहिते पाटील यांचा विरोध होता. अजित पवार यांनी मोहिते यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढली आहे. त्यामुळं दिलीप मोहिते यांनी आढळराव पाटलांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या