Sanjay Raut News : ‘नरेंद्र मोदी यांनी स्वत:च्या सरकारच्या काळात सुरू केलेले फक्त पाच प्रकल्प दाखवून द्यावेत. मोदींनी फक्त उद्घाटन करण्याचं आणि फीत कापण्याचं काम केलं आहे. त्यांनी उद्घाटन केलेल्या प्रत्येक प्रकल्पाची पाया २०१४ च्या आधी घातला गेला आहे, ’ असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे (Shiv Sena UBT) खासदार संजय राऊत यांनी आज केला.
लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections 2024) पार्श्वभूमीवर दावे-प्रतिदावे आणि आरोप-प्रत्यारोपांना उधाण आलं आहे. विकासकामांच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदी (Narendra Modi) हे आधीच्या सरकारांना लक्ष्य करत आहेत. आमच्या सरकारनं अनेक प्रकल्प सुरू केल्याचं सांगत आहेत. त्यांच्या या दाव्याचा संजय राऊत यांनी समाचार घेतला. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषद ते बोलत होते.
‘पंतप्रधान मोदी यांनी सुरू केलेले केवळ पाच प्रकल्प दाखवावेत. मागच्या दहा वर्षांत मोदींनी ज्या प्रकल्पांचं उद्घाटन केलंय, ते सगळे त्यांचं सरकार येण्याआधीच सुरू झाले होते. मग तो प्रकल्प ब्रह्मपुत्रेवरील पुलाचा असो, जम्मू-काश्मीरचा असो किंवा संरक्षणाशी संंबंधित प्रकल्प असो. हे सगळे प्रकल्प आधीच सुरू झाले होते. मोदींनी फक्त फिती कापण्याचं काम केलं आहे, दुसरं काही नाही,’ असं राऊत म्हणाले.
'मोदींचं सरकार सातत्यानं खोटं बोलत आलंय. खोट्याच्या आधारावरच हे सरकार आलंय आणि चाललंय. किती खोटं बोलणार? आता शेवटचे दोन महिने काय बोलायचं ते बोलून घ्या, असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी हाणला.
भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या यादीत कृपाशंकर सिंह (Kripashankar Singh) यांचं नाव आहे. पवन सिंहचं नाव आहे. यातले अनेक लोक डागाळलेले आहेत. त्यांचं नाव लोकसभेचे उमेदवार म्हणून जाहीर झालं आहे आणि नितीन गडकरींचं (Nitin Gadkari) नाव नाही. हा नितीन गडकरी यांचा अपमान आहे. महाराष्ट्राचा अपमान आहे, असं राऊत म्हणाले.
‘नितीन गडकरी हे स्पष्टवक्ते आहे. प्रामाणिक नेते आहेत. त्यांचं नाव लोकसभा उमेदवारांच्या यादीत नाही हे पाहून आम्हाला वाईट वाटलं. काय होणार माहीत नाही,’ असं सूचक वक्तव्यही राऊत यांनी केलं.
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. त्यावरही राऊत यांनी भाष्य केलं. 'प्रियांका गांधी निवडणूक लढल्या तर इंडिया आघाडीला त्याचा मोठा फायदा होईल. त्या दीव-दमणमधून लढल्या काय किंवा यूपीतून त्या नक्कीच निवडून येतील. अर्थात, त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचं का, हा काँग्रेस पक्षाचा निर्णय असेल, असं राऊत म्हणाले.
संबंधित बातम्या