Shirur Loksaha Result : पुणे जिल्ह्यातील लक्षवेधी निवडणुकीत पुन्हा एकदा डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला आहे. या निवडणुकीत माजी खासदार आढळराव पाटील यांनी कोल्हे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. तर अजित पवार यांनी देखील ‘हा निवडून कसा येतो बघतो’, असे धमकीवजा वक्तव्य केले होते. मात्र, अजित पवारांच्या या धमकीला शिरूर मतदार संघातील जनतेने कोल्हे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून उत्तर दिले आहे.
शिरूरमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे आणि अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात थेट लढत झाली. ही निवडणूक रंगतदार झाली. प्रचारादरम्यान अनेक आरोप प्रत्यारोप नागरिकांनी पाहिले. अजित पावर यांनी देखील अमोल कोल्हे यांच्यावर गंभीर आरोप करून ते निवडणून कसे येतात असे व्यक्तव्य केले होते.
मात्र, आज झालेल्या मतमोजणीत कोल्हे हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते. जशा फेऱ्या होत गेल्या त्याप्रमाणे कोल्हे यांनी आढळराव पाटील यांच्यावर एकतर्फी विजय मिळवला. अमोल कोल्हे यांची पहिल्या काही फेरीतील आघाडी ही १८ ते २० हजार होती मात्र, अखेरच्या फेरी पर्यंत अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांच्यापेक्षा तब्बल १ लाख मतांचे लीड घेत त्यांच्या दारुण पराभव केला.
अजित पवार गटाचे उमेदवार बारामतीत व शिरूरमध्ये पिछाडीवर होते. बारामतीत सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांचा दारुण पराभव केला. तर शिरूरमध्ये कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचा पराभव केल्याने अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. या दोन्ही मतदार संघात देखील अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी लढत पाहायला मिळाली. राष्ट्रवादीत फुट पडली तेव्हा अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांची साथ दिली, दरम्यान, विजय झाल्यावर अमोल कोल्हे यांनी धोका देना हमे आता नही और बदला लेना हम कभी भुलते नही! असे म्हणत अजित पवार यांना टोला लगावला आहे.
शिवाजीराव आढळराव पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत होते. शिरूर तालुक्यात शिवसेनेचे मोठे मतदान आहे. मात्र, ही जागा महायुतीने राष्ट्रवादी अजित पवार गटाला दिली. या ठिकाणी अजित पवार यांच्याकडे कोल्हे यांच्या विरोधात तगडा उमेदवार नव्हता. मात्र, शिवाजीराव आढळराव यांचा राष्ट्रवादीत प्रवेश करून त्यांना येथून उमेदवारी अजित पवारांनी दिली. एकीकडे अजित पवार यांचे कट्टर विरोधक अशी ओळख असलेल्या आढळराव पाटलांची ही भूमिका जनतेला पटली नाही. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाचा फटका आढळराव पाटील यांना बसल्याचे बोललणे जात आहे.