Shirur Lok Sabha Constituency: शिरूर मतदारसंघातील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हेंनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे. कोल्हेंनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांचा पराभव केला. मतमोजणीच्या सुरुवातीपासून अमोल कोल्हे आघाडीवर होते.अमोल कोल्हे यांच्या विजयानंतर आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे अभिनंदन केले. तसेच हा निष्ठा आणि स्वाभिमानाचा विजय आहे, अशा शब्दात रोहित पवार यांनी अजित पवार आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांना टोला लगावला.
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि आजित पवार गट असे दोन गट पडले. शरद पवार गटाने शिरूर मतदारसंघातून पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्याविरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. त्यावेळी अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना कसा निवडून येतो बघतोच असे खुले चॅलेंज दिले होते. यावर रोहित पवार यांनी एक्सच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली. छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीत निष्ठा आणि स्वाभिमानाचा झेंडा फडकला! शिरुरच्या स्वाभिमानी जनतेने दिले. यावेळी कसा निवडून येतो? याचे उत्तर अमोल कोल्हेंनी अजित पवारांना दिले, असे रोहित पवार म्हणाले. तसेच त्यांनी शिरूर मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजय मिळवल्याबद्दल अमोल कोल्हेंना शुभेच्छा दिल्या.
शिरूरचा गड राखल्यानंतर एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने अमोल कोल्हे यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी ते म्हणाले की, शिरुर लोकसभा मतदारसंघातील जनतेचा हा विजय आहे. महाविकास आघाडीतील प्रत्येक कार्यकर्त्याने घेतलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. शिरुर लोकसभेच्या जनतेने दुसऱ्यांना माझ्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे मला जबाबदारीची जाणीव आहे.
अमोल कोल्हेंना अजित पवार यांनी दिलेल्या चॅलेंजबाबत विचारले असता ते म्हणाले की, अजित पवार फार मोठे नेते आहेत. इतक्या मोठ्या नेत्याविषयी माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याने बोलू नये. त्यांना जे काही उत्तर द्यायचे आहे, ते शिरूर मतदारसंघातील जनतेने दिले. शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करणे हेच माझे कर्तव्य आहे.
संबंधित बातम्या