आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील जवळपास सर्वच मतदारसंघात उमेदवारांची घोषणा झाली आहे. काही मतदारसंघात एक उमेदवार ठरला तर विरोधातील उमेदवार ठरणे बाकी आहे. मात्र संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा मतदारसंघात अजून एकही उमेदवार ठरला नव्हता. आता महाविकास आघाडीने यात आघाडी घेत आपला उमेदवार जाहीर जवळपास जाहीर केला आहे. शरद पवार (Sharad Pawar Camp)गटाकडून साताऱ्यातून शशिकांत शिंदे (Shashikant shinde) यांना उमेदवारी निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे.
शरद पवार गटाकडून उद्या (मंगळवार)शशिकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा केली जाऊ शकते. उद्या महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद बोलावण्यात आली आहे. त्यानंतर १५ एप्रिल रोजी शशिकांत शिंदे लोकसभेसाठी अर्ज दाखल करणार असल्याचेही सांगम्या येत आहे. शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरताना साताऱ्यात मविआकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. यादिवशी शरद पवार साताऱ्यात येणार आहेत. शरद पवार गट आणि शशिकांत शिंदे यांचे कार्यकर्ते निवडणुकीच्या कामाला लागले आहेत.
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सातारा जिल्हा त्यांचा बालेकिल्ला राहिला आहे. आधी उदयनराजे राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील हे साताऱ्याचे विद्यमान खासदार आहेत. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी लोकसभा निवडणूक लढण्यास नकार दिला होता. त्यानंतर शरद पवारांनी नव्या उमेदवाराचा शोध सुरू केला. चार-पाच नावे पदाधिकाऱ्यांनी सुचवली होती. त्यानंतर शरद पवार यांच्याकडून काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा पर्याय तपासला गेला. मात्र त्यांनी तुतारी चिन्हावर निवडणूक लढावी, अशी अट ठेवली. परंतु, पृथ्वीराज चव्हाण यांनी तुतारीच्या चिन्हावर लढण्यास नकार दिला.
त्यानंतर शरद पवार साताऱ्यातून कोणाला रिंगणात उतरवणार, याची उत्सुकता होती. अखेर शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती समोर येत आहे.शशिकांत शिंदे यांनी काही दिवसापूर्वी लोकसभा लढण्याची इच्छा व्यक्त केली होती.
शशिकांत शिंदे माथाडी कामगारांचे नेते असून सातारा जिल्ह्यातील मोठे नेते आहेत. यापूर्वी त्यांनी जावळी आणि कोरेगाव या दोन विधानसभा मतदारसंघांतून आमदारकीला विजय मिळवला आहे.
संबंधित बातम्या