Sharad Pawar invitation to Shinde Fadnavis :लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात एकमेकांवर कुरघोडी करण्याची स्पर्धा सुरू असताना बारामतीमधून वेगळीच बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवारांना आपल्या घरी जेवणाचं आमंत्रण दिलं आहे. पवारांच्या या आमंत्रणामुळं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे.
येत्या शनिवारी, २ मार्च रोजी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या परिसरात राज्य सरकारच्या वतीनं नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस हे देखील या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. मेळाव्याचं स्थळ असलेल्या विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष स्वत: शरद पवार आहेत. पवारांचं गोविंदबाग हे निवासस्थान जवळच आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्तानं बारामतीमध्ये येणाऱ्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना शरद पवारांनी जेवणाचं आमंत्रण दिलं आहे. पवारांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना स्वत: फोन करून तशी विनंती केली आहे. पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी हे आमंत्रण स्वीकारलं आहे की नाही याची माहिती मिळू शकलेली नाही.
'नमो महारोजगार मेळावा बारामतीमध्ये होतोय. पवार साहेब अध्यक्ष असलेली संस्था आयोजक आहे. त्यामुळं तिथं येणारे लोकप्रतिनिधी व नेते आमचे पाहुणे आहेत. त्यामुळं आम्ही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रण दिलं आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
‘गोविंदबाग हे पवार कुटुंबीयांचं निवासस्थान असलं तरी इथं नेहमीच लोकांचा राबता असतो. लोक येऊन भेटत असतात. लोक आले की आम्हाला आनंद होतो. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील आमच्याकडं येऊन गेले आहेत. आता एकनाथ शिंदे आणि फडणवीसांनाही बोलावलं आहे. मी सध्या बारामतीमध्ये आहे. पवार साहेब मुंबईत आहेत. त्यामुळं त्यांचं आमंत्रण स्वीकारलं गेलं आहे की नाही याची मला माहिती नाही,' असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
राजकीय विरोधक किंवा सत्ताधारी पक्षातील बडे नेत्यांचं बारामतीत येणं आणि त्यांनी शरद पवारांची भेट घेणं हे नवीन नाही. आजवर अनेक बड्या नेत्यांनी बारामतीमध्ये पवारांचा पाहुणचार घेतला आहे. मात्र, यावेळी पवारांनी दिलेल्या आमंत्रणाची जास्तच चर्चा आहे. त्याला कारणही तसंच आहे. येत्या काही दिवसात लोकसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं बारामती लोकसभा मतदारसंघाची सर्वाधिक चर्चा आहे. कारण, यावेळी पवारांचे पुतणे अजित पवार हेच शरद पवारांचे प्रतिस्पर्धी असून त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध आपली पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची तयारी केली आहे. त्यांना शिंदे व फडणवीसांच्या पक्षाची साथ मिळणार आहे. असं असताना पवारांनी तिघांनाही आमंत्रण दिल्यामुळं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.