sanjay raut on LS results 2024 : देशभरात लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून विविध ठिकाणचे कल हाती येत आहेत. सुरुवातीच्या कलानुसार भाजपप्रणित एनडीए व काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीमध्ये जोरदार टक्कर आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी जोरदार कामगिरी करत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पिछाडीवर होते. देशभरात याची जोरदार चर्चा होती. हाच धागा पकडून संजय राऊत यांनी निकालावर प्रतिक्रिया दिली. 'ईश्वराचा अवतार असलेले नरेंद्र मोदी हेच काही फेऱ्यांमध्ये पिछाडीवर होते यावरून काय ते समजा. हाच देशाचा कल आहे. सध्या सुरुवातीचे कल आहेत. पूर्ण निकाल येऊ द्या. इंडिया आघाडीचाच विजय होईल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
'काँग्रेस ज्या पद्धतीनं घोडदौड करतेय, ते पाहता काँग्रेस १०० चा आकडा पार करेल. तसं झालं तर इंडिया आघाडी विजयी होईल हे निश्चित आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस १५० च्या पुढं जाईल असं दिसतंय. त्यामुळं देशाचं संपूर्ण चित्रच बदलून जाईल, असं राऊत म्हणाले.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राहुल गांधी हे पंतप्रधानसाठी आपली पहिली पसंत असल्याचं म्हटलं होतं. त्याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले, राहुल गांधी यांनी या निवडणुकीत देशात एक तुफान उभं केलं. काँग्रेसचे सर्वाधिक खासदार निवडून आल्यास त्यांचा पंतप्रधान होईल. राहुल यांनी नेतृत्व करावं अशी सर्वांची इच्छा आहेच.'