Sanjay raut taunt Amit shah : लोकसभा निवडणुकीतीलचौथ्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.इंडिया आघाडीकडे पंतप्रधानपदाचा चेहरा नाही, ते पाच वर्षात देशावर पाच पंतप्रधान थोपवू शकतात, असा हल्लाबोल अमित शहा (Amitshah)यांनी केला होता. त्यावर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदारसंजय राऊत यांनी खोचक टोला लगावला आहे.अमित शहा जर इंडिया आघाडीमध्ये येणार असतील तर आम्ही त्यांना पंतप्रधान करू असा टोला राऊतांनी केला आहे.
जालना येथील सभेत बोलताना अमित शहांनी इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली होती. अमित शहा म्हणाले होते की, एकीकडे राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली १२ लाख कोटी रुपयांचा घोटाळा करणारी इंडिया आघाडी आहे. तर दुसरीकडे २३ वर्षांपासून एकही सुट्टी न घेता भारतमातेची सेवा करणारे नरेंद्र मोदी आहेत. त्यांच्यावर २५ पैशांच्या भ्रष्टाचाराचा आरोप कोणी करू शकत नाही. एनडीएकडे नेता, नीती आणि आगामी २५ वर्षांसाठी देशाच्या विकासाचा अजेंडा आहे. विरोधकांकडे ना नेता आहे, ना नीती आहे, असा हल्लाबोल अमित शहा यांनी केला होता.
अमित शहांच्या या वक्तव्याचा संजय राऊत यांनी खोचक शब्दात पलटवार केला. पत्रकारांनी अमित शहा यांच्या विधानाबाबत प्रश्न विचारताच संजय राऊत म्हणाले, आमच्याकडे पंतप्रधानपदासाठी नेता नाही, मग काय करायचं? अमित शह येत आहेत का इंडिया आघाडीमध्ये? आम्ही त्यांना पंतप्रधान करतो. तुमचा चेहरा बघा आधी, थकला आहे आता. आजारी पडला आहे. त्यांच्याकडून रोज खोटं बोललं जात आहे. आम्ही आमचं बघू, तुम्ही आमची चिंता करू नका, असा पलटवार राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार टीका केली. राऊत म्हणाले, नरेंद्र मोदींचं मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडलं आहे. भाजपनं एक पक्ष म्हणून जबाबदारी घेऊन आपल्या या लाडक्या नेत्यावर उपचार करणं गरजेचं आहे. नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे.
दहा वर्षे जी व्यक्ती पंतप्रधानपदावर बसलेली आहे. नेतृत्व करत आहे. जे तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांनी देशाचं भवितव्य, देशाचा विकास, या विषयावर आपल्या भूमिका मांडल्या पाहिजेत. त्यांना तिसऱ्यांदा का निवडून द्यायचं याची त्यांच्याकडे ब्लू प्रिंट पाहिजे. दहा वर्षांत काय कामं केली आहेत, हे सांगितलं पाहिजे. मात्र मोदींनी एकाही प्रचारसभेत अशी भूमिका मांडल्याचं दिसलं नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.