Sangli Loksabha : सांगलीत महाविकास आघाडीत बिघाडी! विशाल पाटील अपक्ष लढणार, भरला उमेदवारी अर्ज
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Sangli Loksabha : सांगलीत महाविकास आघाडीत बिघाडी! विशाल पाटील अपक्ष लढणार, भरला उमेदवारी अर्ज

Sangli Loksabha : सांगलीत महाविकास आघाडीत बिघाडी! विशाल पाटील अपक्ष लढणार, भरला उमेदवारी अर्ज

Apr 15, 2024 07:16 PM IST

Sangli Lok sabha Election 2024 : सांगली लोकसभा मतदारसंघाचा तिढी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

विशाल पाटील अपक्ष लढणार, भरला उमेदवारी अर्ज
विशाल पाटील अपक्ष लढणार, भरला उमेदवारी अर्ज

Sangli loksabha election 2024 : सांगली लोकसभा मतदार संघात (Sangli Loksabha Election) महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा धक्का बसला आहे. तिकीट न मिळाल्याने काँग्रेसवर नाराज असलेले विशाल पाटील यांनी अखेर अपक्ष म्हणून अर्ज दाखल करत महाविकास आघाडीचे टेन्शन वाढवलं आहे. त्याचबरोबर सांगली मतदारसंघाचा तिढाही आता वाढला आहे.

शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून महाविकास आघाडीत मतभेदाच्या ठिणग्या उडत आहेत. उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेस नेते विशाल पाटील (Vishal Patil)आणि कार्यकर्ते नाराज झाले असून विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज भरत आपण लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे दाखवून दिले आहे.

काही दिवसापूर्वी मिरज काँग्रेस समिती बरखास्तीचा ठराव केल्यानंतर सांगलीतील काँग्रेस भवन इमारतीवरील काँग्रेस शब्द कार्यकर्त्यांनी पुसला होता. त्यातच आता कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याचसोबत आता विशाल पाटील उद्या शक्तीप्रदर्शन करत काँग्रेसकडून मैत्रीपूर्ण लढतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता असल्याची माहिती स्थानिक सुत्रांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगली मतदारसंघासाठी काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी दोन उमेदवारी अर्ज घेतले होते. आज विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी म्हणून अर्ज दाखल केला आहे. मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विशाल पाटील यांनी उमेदवारी दाखल केली आहे. विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे सांगलीत ठाकरे गटाच्या उमेदवारासमोर अडचणी वाढल्या आहेत.

दरम्यान सांगलीत भाजपलाही मोठा हादरा बसला आहे. जत तालुक्यातील भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी पक्षाचा राजीनामा देत अपक्ष निवडणूक लढणाऱ्या काँग्रेसच्या विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. विलासराव जगताप यांचा संजय पाटील यांच्या उमेदवारीला विरोध होता. मात्र त्यांचा व अन्य भाजप नेत्यांचा विरोध डावलून भाजपने संजयकाका पाटील यांना उमेदवारी दिल्याने विलासराव जगताप यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. आता थेट पक्षाचा राजीनामा देत विशाल पाटील यांना पाठिंबा दिला आहे.

Whats_app_banner