मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Sangli lok Sabha election : सांगलीत काय होणार?; विश्वजीत कदम म्हणाले, नेत्यांनी निर्णयाचा फेरविचार करावा!

Sangli lok Sabha election : सांगलीत काय होणार?; विश्वजीत कदम म्हणाले, नेत्यांनी निर्णयाचा फेरविचार करावा!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Apr 10, 2024 06:44 PM IST

Vishwajeet Kadam on Sangli Lok Sabha : सांगली लोकसभेची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला देण्याचा निर्णय झाल्यानंतर 'नॉट रिचेबल' झालेले आमदार विश्वजीत कदम व इच्छुक उमेदवार विशाल पाटील हे आज मीडियासमोर आले.

सांगलीत काय होणार?; विश्वजीत कदम म्हणाले, कार्यकर्त्यांशी चर्चा करून काय ते ठरवू!
सांगलीत काय होणार?; विश्वजीत कदम म्हणाले, कार्यकर्त्यांशी चर्चा करून काय ते ठरवू!

Vishwajeet Kadam on Sangli Lok Sabha : महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर झालं असलं तरी सांगली लोकसभेच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा सुटताना दिसत नाही. ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला गेली असली तरी काँग्रेसचे स्थानिक नेते अद्यापही आग्रही आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी इथेल्या उमेदवारीबाबत फेरविचार करावा, अशी विनंती काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी केली आहे. त्याचबरोबर, कार्यकर्त्यांशी बोलून योग्य तो निर्णय घेऊ, असं सूचक विधानही केलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

महाविकास आघाडीच्या जागावाटपात सांगली लोकसभेची जागा शिवसेनेला गेल्यानंतर सांगलीतील काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील व आमदार विश्वजीत कदम ‘नॉट रिचेबल’ होते. आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी भूमिका मांडली.

'कालच जागावाटप जाहीर झालं. जवळपास सर्व जागा घोषित करण्यात आल्या. सांगलीच्या जागेबद्दल आम्हाला कळलं ते कुणालाही पचनी पडलं नाही. कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळं त्यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत. त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत. एकमेकांना धीर देणार आहोत. यातून सकारात्मक मार्ग कसा निघेल यासाठी आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून प्रयत्न करणार आहोत, असं विश्वजीत कदम यांनी सांगितलं.

सांगलीच्या निर्णयाचा फेरविचार करावा!

सांगलीचा राजकीय इतिहास, सांगलीच्या जनतेची व काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना समजून घेऊन महाविकास आघाडीनं निर्णय घेतला असता तर मागच्या १५ दिवसांत जी काही परिस्थिती निर्माण झाली, ती झाली नसती. आम्ही सातत्यानं काँग्रेसला ही जागा मिळावी म्हणून विनंती करत होतो. आजही आम्ही तेच म्हणत आहोत. सांगलीची राजकीय परिस्थिती, सध्याची स्थिती काय आहे हे समजून घेऊन उमेदवारीचा फेरविचार करता आला तर तो करावा, असं विश्वजीत कदम म्हणाले. ‘येणाऱ्या काळात जो काही निर्णय आहे तो आमच्या पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करून घेऊ. महाविकास आघाडीसाठी सकारात्मक असाच तो निर्णय असेल,’ असंही विश्वजीत कदम म्हणाले.

सांगलीत काँग्रेसची मोठी ताकद

सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे दोन आमदार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी काम करत आहेत. अनेक ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेसला मानणारे लोक आहेत. ही काँग्रेस पक्षाची मजबूत बाजू आहे. पक्ष इथं निवडणूक लढण्यास सक्षम आहे हे आम्ही आजवर मांडलं आहे, असं विश्वजीत कदम यांनी यावेळी सांगितलं.

उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आदर

उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आमच्या मनात अत्यंत आदर आहे. गेल्या काही काळापासून ते ज्या पद्धतीनं राजकीय संघर्ष करत आहेत, त्याविषयी देखील आमच्या मनात आदर आहे. मात्र, सांगलीचा इतिहास वेगळा आहे. आम्ही सातत्यानं हे सांगत होतो. तो समजून घेऊन उमेदवारी झाली असती तर बरं झालं असतं, असं विश्वजीत कदम म्हणाले.

WhatsApp channel