Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray vs Congress: लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यूला ठरला. सांगली, भिवंडी आणि उत्तर मुंबई मतदारसंघाबाबत तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळाले. नुकतीच महाविकास आघाडी पक्षाची पत्रकार परिषद पार पडली, ज्यात मुंबईची जागा काँग्रेस लढवणार आहे. भिवंडीच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपला उमेदवार उभा करेल. तर, सांगलीची जागा ठाकरे गटाला देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. मात्र, सांगलीची जागा ठाकरे गटाला मिळाल्याने काँग्रेसमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. सांगलीची जागा काँग्रेसकडेच हवी होती, असे काँग्रेसमधील अनेक नेत्यांचे मत आहे. यासाठी सांगली जिल्हा काँग्रेस उद्या महत्त्वाची बैठक बोलावली आहे.
सांगलीची जागा ठाकरे गटाला देण्यात आल्याने अनेक काँग्रेस नेते नाराज आहेत. काँग्रेसचे काही नेते नॉट रिचेबल असल्याचे समजत आहे. याच पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा काँग्रेस मध्ये उद्या (बुधवारी, १० एप्रिल २०२४) महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. काँग्रेस नेते आणि आमदार विश्वजीत कदम , विशाल पाटील यांच्यासह काँग्रेसचे स्थानिक नेते या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. सांगली जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत नेमका कोणता निर्णय घेतला जाईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सांगलीची जागा काँग्रेसकडेच हवी होती, उद्या बैठक घेऊन भूमिका जाहीर करू, असे काँग्रेस नेते विक्रम सावंत यांनी म्हटले आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघातून विशाल पाटील यांनी निवडणूक लढवण्यासाठी इच्छा व्यक्त केली होती. सांगली मतदारसंघातून विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी, यासाठी विश्वजीत कदम यांनी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. मात्र, महाविकास आघाडीच्या जागावाटपावेळी ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली. या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर काँग्रेसमधील अनेक नेते नाराज झाले आहेत. विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. सध्या विश्वजीत कदम आणि विशाल पाटील नॉटरिचेबल असल्याची चर्चा आहे.
सांगली येथील पत्रकार परिषदेनंतर संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जागावाटपावरून महाविकास आघाडीमधील पक्षांमध्ये कोणतीही नाराजी नाही, सर्व काही ठीक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.