मराठी बातम्या  /  elections  /  Ramdas Kadam warns BJP : भाजपनं २००९ ला मला पाडलं, आता मुलाला त्रास देतायत; रामदास कदम यांचा आरोप

Ramdas Kadam warns BJP : भाजपनं २००९ ला मला पाडलं, आता मुलाला त्रास देतायत; रामदास कदम यांचा आरोप

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 07, 2024 03:57 PM IST

Ramdas Kadam allegations on BJP : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

भाजपनं २००९ ला मला पाडलं, आता मुलाला त्रास देतायत; रामदास कदम यांचा आरोप
भाजपनं २००९ ला मला पाडलं, आता मुलाला त्रास देतायत; रामदास कदम यांचा आरोप

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच आता स्थानिक पातळीवरही आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी भाजपवर जाहीर आरोप केला असून इशाराही दिला आहे.

रामदास कदम यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम यांच्या मतदारसंघात भाजपचे नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) हे हस्तक्षेप करत असल्याचा कदम यांचा आरोप आहे. त्यामुळं ते संतापले आहेत. त्यांनी भाजपला (BJP) थेट इशारा दिला आहे.

‘महाराष्ट्रात भाजपच्या माध्यमातून जे काही चाललंय, ते घृणास्पद आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी राज्यातील नेत्यांचे कान उपटले पाहिजेत. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा आहे हे मान्य आहे. मात्र, तुमच्यावर विश्वास ठेवून जे लोक तुमच्यासोबत आले आहेत, त्यांचा केसानं गळा कापू नका. भाजपच्या बाबतीत चुकीचा मेसेज राज्यात जाऊ नये याचं भान भाजपच्या काही नेत्यांनी राखणं गरजेचं आहे,’ असं रामदास कदम म्हणाले.

२००९ ला भाजपनंच मला पाडलं!

'२००९ मध्ये युती असतानाही मला गुहागरमध्ये भाजपनं पाडलं हे वास्तव आहे. आता माझ्या मुलाच्या मतदारसंघात भाजपचे रवींद्र चव्हाण आणि त्यांचे कार्यकर्ते स्थानिक आमदाराला बाजूला ठेवून कामं करतायत. हेतुपरस्पर त्रास देत आहेत, असा आरोप कदम यांनी केला.

'हे असंच सुरू राहिलं भविष्यात भाजपवर कुणीही विश्वास ठेवणार नाही. याची दखल भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून घेतली गेली पाहिजे. आम्ही मोदी आणि शाह याच्याकडं बघून आलोय. मागे काय झालं ते सोडून देऊ. पण पुन्हा पुन्हा विश्वाघात होणार असेल तर माझंही नाव रामदास कदम आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

आमच्या दृष्टीनं त्यांची केस संपलेली! - संजय राऊत

भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या गटातील मतभेद व रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांवर खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी फार काही बोलणं टाळलं. ‘त्यांचा केसानं गळा कोण कापतंय याच्याशी आम्हाला देणंघेणं नाही. आमच्या दृष्टीनं त्यांची केस संपलेली आहे आणि पुढच्या निवडणुकीत जनता त्यांची पूर्ण फाइल बंद करणार आहे. त्यांच्यावर आम्हाला बोलायची गरज नाही,’ असं राऊत म्हणाले.

WhatsApp channel