Pune Lok Sabha Election Result 2024 : पुण्यात तिरंगी लढत असे चित्र होते. भाजपकडून मुरलीधर मोहोळ, काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर व वंचितकडून वसंत मोरे हे निवडणूक रिंगणात उभे होते. पुण्यातील लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते. कारण विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा पारंपरिक मतदार संघ असलेल्या कसबा मतदार संघात रवींद्र धंगेकर हे जायंट किलर ठरले होते. त्यामुळे काँग्रेसने पुन्हा त्यांना लोकसभेची उमेदवारी देत निवडणूक रिंगणात उभे केले. सुरवातीला ही निवडणूक एकतर्फी वाटत होती. मात्र, रवींद्र धंगेकर यांनी ही निवडणूक दुरंगी केली. वंचितचे वसंत मोरे यात कोठेही दिसले नाही. पुण्याचा सामना हा मोहोळ विरुद्ध धंगेकर असाच लढला गेला. अखेर, पुणे करांनी विकासाला प्राधान्य देत भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांना निवडणूक दिले. यावेळी धंगेकर यांच्या कसबा मतदार संघातून देखील मोहोळ यांना मोठे मताधिक्य मिळाले.
पुण्यात सुरवातीला सोपी वाटणारी निवडणूक मुरलीधर मोहोळ यांना कठीण केली. रांविद्र धंगेकर यांनी संपूर्ण मतदार संघ पिंजून काढून मोहोळ यांना घाम फोडला. प्रत्येकाच्या घरी जाऊन रवींद्र धंगेकर यांनी प्रचार केला. यामुळे पुण्याची जागा भाजपच्या हातातून जाणार व धंगेकर निवडून येणार असे चित्र मतदान झाल्यावर होते. मात्र, आज सकाळी८ पासून सुरू झालेल्या मतमोजणीत मुरलीधर मोहोळ हे कायम आघाडीवर होते. सुरवातीच्या काही फेऱ्यांमध्ये मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांच्यात चढाओढ होती. धंगेकर सुरवातीला आघाडीवर होते. मात्र, मुरलीधर मोहोळ यांनी नंतर मतमोजणीत पुनरागमन केले. तसेच मतमोजणीत आघाडी देखील मिळवली.
चार फेऱ्यानंतर पुण्यात मुरलीधर मोहोळांनी २७ हजार ५९८ ची आघाडी घेतली. यात मोहोळांनी धंगेकरांच्या कसबा मतदारसंघातून ५ हजार १३१ मतांची आघाडी घेतली होती. कसबा मतदारसंघात मुरलीधर मोहोळ यांना १७ हजार ७५१ मते तर रवींद्र धंगेकरांना १२ हजार ६२० मते मिळाली. पाचव्या फेरीअखेरीस मुरलीधर मोहोळ ३४ हजार ८५१ मतांनी पुढे होते. या फेरीअखेरीस रविंद्र धंगेकर यांना १ लाख ११ हजार ८८९ मते मिळाली तर मोहोळ यांना १ लाख ४५ हजार ७४० मते मिळाली. मतांची ही आघाडी मोहोळ यांनी सहाव्या फेरीअखेर कायम ठेवली. या फेरीत मुरलीधर मोहोळ ३७ हजार ६९३ ने आघाडीवर होते. तर सातव्या फेरीत मोहोळ ४५ हजार ४१९ मतांनी पुढे होते. आठव्या फेरीनंतर मुरलीधर मोहोळ यांनी ४६ हजार ४६९ मतांची आघाडी घेतली. ही आघाडी वाढवत १० व्या फेरीत मोहोळ हे ५० हजारांच्या फरकाने पुढे राहिले. हे लिड नंतरच्या फेऱ्यांमध्ये ७० हजारांच्या जवळपास गेले. मुरलीधर मोहोळ यांचे हे लिड तोडणे धंगेकरांसाठी अशक्य ठरले. त्यामुळे शेवटच्या फेरीत मुरलीधर मोहोळ यांनी ८१ हजार ०३७ मतांच्या फरकाने विजय मिळवला.
पुणे मतदार संघात एकूण २० लाख ६१ हजार २७६ मतदार आहेत. त्यापैकी ११ लाख ३ हजार ६७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. वडगाव शेरी २ लाख ४१ हजार ८१७, शिवाजीनगर १ लाख ४१ हजार ११३, कोथरूड २ लाख १७ हजार ४५५, पर्वती १ लाख ८९ हजार १८४, पुणे कॅन्टोन्मेंट १ लाख ४९ हजार ९८४, तर कसबा मतदारसंघात १ लाख ६४ हजार १०५ मतदान झाले होते.
मुरलीधर मोहोळ यांनी पुण्याचे महापौर असतांना अनेक विकास कामे केली. खास करून करोंना काळात त्यांनी केलेली कामे ही नागरिकांच्या लक्षात राहिली. त्यामुळे मोहोळ यांना उमेदवारी घोषित झाल्यापासून ते निवडणूक येणार याची अनेकांना खात्री होती. मात्र, रवींद्र धंगेकर हे सामान्य नागरिकांचे उमेदवार असून मी पुणेकरांचा उमेदवार तर मोहोळ हे मोदी यांचे उमेदवार असे वातावरण तयार करत त्यांनी मोहोळ यांना आव्हान दिले होते. मात्र, हे आव्हान पेलत मुरलीधर मोहोळ यांनी रवींद्र धंगेकर यांचा तब्बल ८० हजार मतांनी पराभव केला आहे.