लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Elections) तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या काही दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार रामनगरी अयोध्येचा दौरा केला. मोदींनी रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर भाजप उमेदवार लल्लू सिंह यांच्या समर्थनार्थ भव्य रोड शो केला. पंतप्रधान मोदींनी राम मंदिरात प्रभू रामलल्लाचे दर्शन व पूजन केले तसेच रामलल्लासमोर साष्टांग दंडवत घालत आशीर्वाद मागितला. मोदी मंदिरात जवळपास १५ मिनिटे होते. यावेळी मंत्रोच्चारात त्यांनी पूजन आणि आरतीही केली.
पंतप्रधान मोदींनी अयोध्येत दाखल होताच सर्वात आधी रामल्लाचे दर्शन घेतले व त्यानंतर २ किलोमीटर लांब रोड शो केला. मोदींना पाहण्यासाठी अयोध्येत मोठा जनसागर उसळला होता. मोदींनी फैजाबाद लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार लल्लू सिंह यांच्या प्रचारार्श रोड शो केला. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते. रोडशो दरम्यान पंतप्रधान मोदींनी X हँडलवरून पोस्ट केले की, अयोध्यावासीयांचे मनही प्रभु श्री रामांसारखे विशाल आहे. रोड शो मध्ये आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या जनता-जनार्दनाचे अभिनंदन!
रोड शोमध्ये मोदींचा रथ जस जसा पुढे सरकताच 'जय श्री राम', 'हर हर मोदी-घर घर मोदी', 'फिर से मोदी सरकार-अबकी चार सौ पार'सारख्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. जमलेल्या लोकांनी मोदींवर फुलांचा वर्षाव केला. मोदींच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते. बाल कलाकारांनी आपली कला सादर केली. साधु संतही रस्त्याच्या कडेला उभे राहून मोदीचे स्वागत करताना दिसले. मोदींच्या स्वागताला लहान मुले, वृद्ध तसेच महिलाही मोठ्या संख्येने होत्या.
२२ जानेवारी रोजी झाली होती प्राण प्रतिष्ठा -
५०० वर्षानंतर २२ जानेवारी २०२४ रोजी रामभक्तांची प्रतीक्षा संपली. अयोध्येत भगवान रामलल्ला प्राण प्रतिष्ठानंतर भव्य राम मंदिरात विराजमान झाले. या कार्यक्रमात पीएम मोदी मुख्य यजमान होते. पीएम मोदींनी रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा केली होती. त्याबरोबर त्यांनी राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी ११ दिवसांचे व्रतही केले होते.
अयोध्येत लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. शनिवारी मोदींनी झारखंडमधील सभेत म्हटले की, ५०० वर्षापासून आमच्या किती मुली संघर्ष करत राहिल्या, लाखों लोक शहीद होत राहिले, दीर्घकाळ संघर्ष चालला. कदाचित जगातील सर्वात मोठा संघर्ष कोठे झाले असेल तर तो अयोध्येत झाला. तुमच्या मताच्या ताकदीने आज राम मंदिर निर्माण झाले आहे.
संबंधित बातम्या