पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कोल्हापुरात जाहीर सभा पार पडली. जगात भारी कोल्हापुरी, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीमधून आपल्या भाषणाची सुरूवात केली. मोदी म्हणाले मी काशीचा खासदार आहे व आज दक्षिणेतील काशीला आलो आहे, हे माझे सौभाग्य आहे. कोल्हापूरला महाराष्ट्राचे फुटबॉल हब म्हटले जाते. येथील तरुणांमध्ये फुटबॉल खूप लोकप्रिय आहे. त्यामुळे मी फुटबॉलच्या दृष्टीने म्हटल्यास दुसऱ्या टप्प्याचे मतदान पूर्ण झाल्यानंतर आता भाजप आणि एनडीए २.० आघाडीवर आहेत.
मोदी म्हणाले काँग्रेस व इंडिया आघाडीने देशविरोधी आणि द्वेषपूर्ण राजकारणाचे दोन सेल्फ गोल केल्याने पुन्हा एकदा मोदी सरकार येणार हे निश्चित झाले आहे.
मोदी म्हणाले इंडिया आघाडी सत्तेवर आल्यास ते काश्मीरमध्ये पुन्हा ३७० कलम लागू करतील, सीएए कायदा रद्द करतील. पण तुम्ही हे करू देणार का?इंडिया आघाडीआता एका वर्षासाठी एक पीएम असा फॉर्म्युला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे पाच वर्षांत पाच पंतप्रधान देशावर थोपवणार आहेत.
मोदी म्हणाले, अयोध्येतील राम मंदिराचे ५०० वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. काँग्रेसने राम मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रणही काँग्रेसच्या लोकांनी नाकारले. मात्र अन्सारी आणि त्यांचे अयोध्येचे कुटुंब,जे आयुष्यभर राम मंदिराच्या विरोधात कोर्टात खटला लढत राहिले... पण जेव्हा कोर्टाने हे राम मंदिर आहे,असे सांगितले तेव्हा अन्सारी स्वतः राम मंदिराच्या अभिषेक प्रसंगी उपस्थित होते.
मोदींनी आपल्या भाषणात नवा मुद्दा प्रचारात आणला. मोदी म्हणाले की, देशात काँग्रेसची सत्ता आल्यास देशभरात आरक्षणाच्या कर्नाटक मॉडेलची अंमलबजावणी केली जाईल. कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारने एका रात्रीत ओबीसी कोट्यातील २७ टक्के आरक्षण मुस्लिमांना दिले. रातोरात कागदपत्रांवर शिक्के मारुन मुस्लिमांना ओबीसी आरक्षण देऊन टाकले. हाच प्रयत्न काँग्रेसकडून देशभर लागू केला जाईल.
मोदींनी आपल्या भाषणात म्हटले की, कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघातील महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना मत म्हणजे थेट मोदींना मत असणार आहे. या दोघांना मत देऊन मोदीचे हात बळकट करा. येथे उपस्थित लोकांना मी एक माझं वैयक्तिक काम सांगणार आहे. तुम्ही करणार की, माझं एक काम असे आहे की, ज्या लोकांशी तुमची भेट होईल, ज्यांच्या घरात जाल. मी तर सांगेन तुम्ही लोकांना भेटा त्यांच्या घरात जा व त्यांना सांगा मोदींना मताच्या रूपाने आशीर्वाद द्या. तुमचा आशीर्वाद हीच माझी प्रेरणा आहे. त्या लोकांना माझा प्रणाम सांगा.