मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Narendra Modi Exclusive Interview : 'आम्ही नागरिकांना सक्षम करतो, विरोधकांना त्यांची संपत्ती चोरायची आहे: PM मोदी

Narendra Modi Exclusive Interview : 'आम्ही नागरिकांना सक्षम करतो, विरोधकांना त्यांची संपत्ती चोरायची आहे: PM मोदी

Haaris Rahim Shaikh HT Marathi
May 12, 2024 12:37 PM IST

PM Modi interview: लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Hindustan Times चे आर सुकुमार, शिशिर गुप्ता आणि सुनेत्रा चौधरी यांना खास मुलाखत दिली. भाजप पुन्हा सत्तेत आल्यास नवीन सरकारचे लक्ष्य काय असेल यावर मोकळेपणाने चर्चा केली.

Prime Minister Narendra Modi spoke about the state of the campaign, and the focus of his next government should it return to power.
Prime Minister Narendra Modi spoke about the state of the campaign, and the focus of his next government should it return to power. (PMO Photo)

 

 

ट्रेंडिंग न्यूज

आर सुकुमार, शिशिर गुप्ता आणि सुनेत्रा चौधरी

Hindustan Times

 

प्रश्न: तुमच्या सरकारने निवडणुकीपूर्वी अंतरिम अर्थसंकल्पात कोणत्याही मोठ्या लोकानुनय करणाऱ्या योजना जाहीर केल्या नव्हत्या. विरोधकांनी मात्र सत्तेवर आल्यास अनेक गोष्टी मोफत देण्यावर प्रचारात भर दिले आहे?

-गेल्या १० वर्षांत आम्ही लोकांसाठी खूप मेहनत घेतलीय, याची त्यांना जाणीव आहे. लोकांनी त्यांच्या आयुष्यात पडलेला फरक पाहिला आहे. आमच्या ट्रॅक रेकॉर्डमुळे निवडणुकीत आम्हाला कोणत्याही लोकाभिमुख उपाययोजनांची गरज नव्हती. आमच्या सरकारच्या प्रामाणिक वर्तनाचे लक्षण म्हणून लोक याकडे पाहतात.

आम्ही ज्या वेगाने आमची आश्वासने पूर्ण करतो ते जनतेने पाहिले आहे. या सरकारला त्या वेळच्या 'नाजूक ५' अर्थव्यवस्थांपैकी एक असलेल्या देशाचा वारसा मिळाला होता. तो देश आज जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनला, हे त्यांनी पाहिले. आपण सरासरी महागाई दर एका दशकातील नीचांकी पातळीवर आणून ठेवला आहे. आपला बेरोजगारीचा दर जगात सर्वात कमी आहे.

गेल्या दशकभरात जे काम झाले आहे ते स्वातंत्र्यानंतरच्या सात दशकांत झालेल्या कामापेक्षा अधिक आहे. आम्ही १० वर्षांत विमानतळांची संख्या ७४ वरून दुप्पट म्हणजे १५० केली आहे. राष्ट्रीय महामार्गांची लांबी एका दशकात ९१,००० किमीवरून १,४५,००० किमी झाली आहे. भारत एकेकाळी रोखीवर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था होती. आज आम्ही रिअल टाइम पेमेंटमध्ये जागतिक स्तरावर ४६% म्हणजे सिंहाचा वाटा आहे. आपल्या संरक्षण निर्यातीने २१ हजार कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

भारतीय बँकिंग व्यवस्थेला धोक्यात आणणारे मोठे एनपीए असो किंवा कलम ३७० रद्द करणे असो, जम्मू-काश्मीरमध्ये शांततेचे नवे पर्व सुरू करणे असो, आज वारशाच्या प्रश्नांपासून आपण देशाला मुक्त केले आहे.

आज आम्ही एक मजबूत अर्थव्यवस्था तयार केली आहे जी भारताच्या पुढील २५ वर्षांसाठी आधार म्हणून काम करेल. खरे तर आमचे संकल्पपत्र हे केवळ पुढील पाच वर्षांसाठी नाही. दीर्घकालीन बदल आणि २०४७ पर्यंत विकसित भारताकडे नेणारा रोडमॅप तयार करणारे ते संकल्पपत्र आहे.

प्रत्येक नागरिकाचे सक्षमीकरण करणे आणि त्यांना यशस्वी होण्यासाठी आवश्यक साधने देणे हीच खरी प्रगती आहे हे या दहा वर्षांत आपण जगाला दाखवून दिले आहे. गरिबांचे सक्षमीकरण, त्यांना भरभराटीच्या संधी निर्माण करण्यावर आमचा भर आहे. ८० कोटी लोकांना मोफत रेशन मिळेल, ५० कोटींहून अधिक लोकांची स्वतःची बँक खाती खोलणे, ११ कोटी शौचालयांचे बांधकाम आणि ६० कोटी लोकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळेल याची आम्ही खात्री केली आहे. गरिबांच्या उत्थानाभोवती आमची धोरणे केंद्रित आहेत. आपण जे काही करतो त्याच्या केंद्रस्थानी ते आहेत याची आम्ही खात्री करतो. खरं तर गेल्या १० वर्षांत भारतात २५ कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत.

विरोधकांचा अजेंडा एकतर लोकांची संपत्ती हिसकावून घेणे किंवा एससी, एसटी आणि ओबीसी समाजाचे अधिकार नाकारून धर्मावर आधारित आरक्षण सुनिश्चित करणे हा आहे. त्यांना फक्त 'मोदी हटाओ' हवा आहे. अशा प्रतिगामी आणि सांप्रदायिक राजकारणाला जनता बळी पडणार नाही.

Prime Minister Narendra Modi said his government has built a strong economy that will serve as the base for India’s next 25 years.
Prime Minister Narendra Modi said his government has built a strong economy that will serve as the base for India’s next 25 years. (PMO Photo)

प्रश्न: देशातील कोणकोणत्या राज्यांमध्ये भाजपला २०१९ पेक्षा अधिक जागा मिळू शकतात, असं तुम्हाला वाटतं आणि का?

-आम्हाला ऐतिहासिक जनादेशासह परत आणण्याची संपूर्ण भारतातील जनतेची प्रचंड इच्छा आहे. मी देशभरात जाहीर सभा आणि रोड शो केलेत. मी जिथे जातो तिथे मला आमच्या पक्षासाठी 'जनसमर्थन'ची त्सुनामी दिसते. एका मजबूत, निर्णायक आणि संवेदनशील सरकारने देशाला कसे सुरक्षित केले आणि जगात आपले स्थान कसे मजबूत केले आहे, हे संपूर्ण भारतातील जनतेने पाहिले आहे. भ्रष्टाचार, घराणेशाही, अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण, जिथे जिथे इंडी (INDI) आघाडीचे आहे तेथे एकापाठोपाठ एक राज्ये उद्ध्वस्त होत आहे. याला जनता कंटाळली आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एनडीएची सत्ता हवी आहे. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळमध्ये आमच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे.

प्रश्न: यावेळी तुम्ही दक्षिणेकडील तामिळनाडू आणि केरळ या राज्यांवर खूप लक्ष केंद्रीत केले?

-आमची ताबा मिळवण्याची मानसिकता नसते. आम्ही १४० कोटी भारतीयांसाठी सेवेच्या भावनेने काम करत असतो. तामिळनाडू, केरळसह दक्षिण भारतातील जनतेशी आमचे नाते काही नवीन नाही. आम्ही सरकारमध्ये असलो किंवा नसलो तरी तिथल्या जनतेच्या सेवेसाठी आम्ही स्वत:ला झोकून दिलं आहे. आमचे कार्यकर्ते गेली अनेक दशके नि:स्वार्थीपणे काम करत आहेत, अनेकांनी या प्रक्रियेत आपल्या प्राणांची आहुतीही दिली. दक्षिणेतील विविध राज्यांमध्ये दिसणाऱ्या या 'इंडी' आघाडीच्या सरकारमधील भ्रष्टाचार, तुष्टीकरण आणि 'कुटुंब प्रथम' राजकारणाला जनता कंटाळली आहे. आंध्र प्रदेशात प्रशासनाची मोडतोड सुरू असून राज्यातील युवकांचे भवितव्य धोक्यात आले आहे. तेलंगणा आणि कर्नाटकातही काँग्रेस सत्तेवर असल्याने भ्रष्टाचाराचे जाळे प्रस्थापित झाले आहे. अवघ्या काही महिन्यांत सरकारी तिजोरी पोकळ करून राज्यांना दिवाळखोरीच्या अवस्थेत आणण्यात काँग्रेसला यश आले आहे. तामिळनाडूमध्येही हीच परिस्थिती आहे. तेथेही भ्रष्टाचार आणि घराणेशाही आहे.

दुसरीकडे ‘मोदी की गॅरंटी’ किती प्रभावीपणे काम करते हे जनतेने पाहिले आहे. त्यांनी आमचे काम, त्यांच्या कल्याणासाठी आमची बांधिलकी आणि सर्वसमावेशक विकास, स्वच्छ प्रशासन आणि पारदर्शकता आणण्यासाठी आमचे समर्पण पाहिले आहे. यावेळी आमची कामगिरी अभूतपूर्व असेल. मला भाजपबद्दल सकारात्मकता आणि उत्साहाची तीव्र भावना दिसत आहे. आमचा विकास आणि प्रगतीचा संदेश दक्षिण भारतातील जनतेपर्यंत जोरदारपणे पोहोचत आहे.

प्रश्न: २०२४ च्या निवडणुकीत पहिल्या पसंतीचा पक्ष म्हणून भाजप उतरत आहे. आपल्या पदरात आत्मसंतुष्टता राहणार नाही याची काळजी तुम्ही कशी घेत आहात?

-आमच्या पक्षाचा जन्म अनेक वर्षांच्या संघर्षातून आणि 'नेशन फर्स्ट' ही विचारसरणी घेऊन पुढे आला आहे. लोकसभेत केवळ दोन खासदार असलेल्या पक्षापासून संसदेत दोन वेळा पूर्ण बहुमत मिळविणारा पक्ष बनला आहे. आता त्याहूनही मोठ्या जनादेशासह तिसऱ्यांदा सत्तेवर येणार आहे. एक निवडणूक जिंकल्यानंतर पुढच्या निवडणुकीपर्यंत विश्रांती घेऊ, असा विचार करून आम्ही पक्षाची बांधणी केलेली नाही. जनतेने आमच्यावर जो विश्वास ठेवला आहे तो पूर्ण करणे हे आम्ही प्रत्येक विजयाला आपले कर्तव्य मानले. समाजातील अत्यंत गरीब व्यक्तीची सेवा करण्यासाठी आमचे कार्यकर्ते नेहमीच मिशन मोडवर असतात. आमचा दृष्टिकोन स्पष्ट म्हणजेच २०४७ साठी २४x७ काम करणे हा आहे. त्यामुळे भाजपमध्ये आत्मसंतुष्टीला फारसा वाव नाही. २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत.

मी तुम्हाला क्रिकेटच्या परिभाषेत समजावून सांगतो. कसोटी सामन्यात एखाद्या संघाने पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली तरी फायदा असलेला संघ पूर्ण भावनेने सामना खेळून नवे विक्रम रचतो. त्याचप्रमाणे विरोधकांनी पराभव मान्य करून आम्हाला एक प्रकारचा वॉकओव्हर दिला आहे हे आम्हाला माहित आहे. पण तरीही आमचे कार्यकर्ते उत्साही आहेत आणि आमचा पक्ष ही निवडणूक पूर्ण खेळाडूसारख्या भावनेने लढत आहे.

आमच्यासाठी निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव आहे. प्रत्येक नागरिकाला या उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळते आणि म्हणूनच एक पक्ष म्हणून आम्ही प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. लोकांनी आमच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्याची ही वेळ आहे. गेल्या दशकात ज्या प्रकारचे काम झाले आहे त्याबद्दल लोकांपर्यंत सर्व माहिती पोहचावी हे आमचे कार्यकर्ते सुनिश्चित करतात. या निवडणुकीत भाजपच्या बुथ स्तरावरील कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा आणि जिवंतपणा दिसून येतो. निवडणुकीच्या दिवशी मतदानासाठी बाहेर पडताना सर्वांना सोबत घ्या आणि उत्सवी आणि आनंदाचे वातावरण निर्माण करा, असं मी आमच्या कार्यकर्त्यांना सांगत असतो. भारत देश हा आपली लोकशाही किती आनंदाने आणि सामूहिकरीत्या साजरा करतो हे जगाने पाहिले पाहिजे.

प्रश्न: कर्नाटकात प्रज्वल रेवन्ना टेपवरून बराच वाद निर्माण झाला आहे. कर्नाटकात निवडणुका संपल्या असल्या तरी पंतप्रधान या नात्याने तुम्ही या वादावर काही बोलू इच्छिता का? जेडी (एस) तुमचा मित्रपक्ष आहे आणि तुम्ही हासनमध्ये एका निवडणूक सभेला संबोधितही केलं होतं.

-कायद्याच्या दृष्टीने प्रत्येक भारतीय नागरिक समान आहे, असा माझा ठाम विश्वास आहे. संदेशखली असो वा कर्नाटक, ज्यांनी असे घृणास्पद कृत्य केले, मग ते कोणत्याही पक्षाचे असोत, त्यांना कठोर शिक्षा भोगावी लागेल. कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. मग तो भारताचा कोणताही भाग असो.

प्रश्न: बरेच महत्वाचे मुद्दे असतानाही निवडणूक प्रचारात अजूनही धर्म, जात, सवलती आणि आरक्षण याबद्दलच आपण बोलत आहोत. आपला निवडणूक प्रचार हा काळाशी सुसंगत करण्यात आपण अपयशी ठरलो आहे, असे तुम्हाला वाटते का?

-कृपया सर्व पक्षांच्या नेत्यांच्या भाषणांचे सविस्तर विश्लेषण करा म्हणजे कोण पुरोगामी मुद्दांवर बोलतोय आणि कोण केवळ प्रतिगामी मुद्द्यांचा प्रचार करतोय हे आपल्याला दिसेल. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात हे तुलनात्मक विश्लेषण तुम्ही पटकन करू शकता. अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसींचे आरक्षण काढून घेऊन धर्माच्या आधारावर ते त्यांच्या व्होट बँकेला देणे हा काँग्रेस पक्षाचा अजेंडा असेल तर त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करावे लागेल. अशा वेळी गप्प राहणे चुकीचे ठरेल. काँग्रेस पक्षच धर्म आणि फुटीरतावादी मुद्दे, अजेंडा प्रचारात आणत आहे. या समाजातील लोक त्यांच्या धोकादायक अजेंड्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. लोकांच्या आकांक्षांचे प्रतिनिधित्व करणारा पक्ष म्हणून आम्ही त्यांच्या चिंतादेखील प्रतिबिंबित करू. या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे काँग्रेसने द्यायला हवीत.

काळानुरूप विचार केला तर आमच्या पक्षाचा जाहीरनामा, आमच्या नेत्यांची भाषणे पाहिली तर हे स्पष्ट होते की, विकसित भारताची निर्मिती, तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याविषयी बोलणारा आमचाच एकमेव पक्ष आहे.

Prime Minister Narendra Modi alleged that it is the Congress that is bringing religion and divisive issues, agendas into the picture.
Prime Minister Narendra Modi alleged that it is the Congress that is bringing religion and divisive issues, agendas into the picture. (PMO photo)

प्रश्न: भाजपच्या अजेंड्याला संसदेत पाठिंबा देणाऱ्या पक्षांविरोधातही काही राज्यांमध्ये तुम्ही लढत आहात. वैचारिकदृष्ट्या विरोधी पक्षाशी लढण्यापेक्षा हे कितपत वेगळं आहे?

-आपली लोकशाही अनेक भिन्न विचार, विचारधारा आणि विचारसरणी असलेली मजबूत आणि चैतन्यपूर्ण लोकशाही आहे. येथे सर्वांचे स्वागत आहे. विचारसरणीत मतभेद असू शकतात, पण शत्रुत्व असावे असे मला वाटत नाही. आपल्या देशाची एकता आणि अखंडतेवर परिणाम करणाऱ्या काही मूलभूत मुद्द्यांवर नेहमीच एकमत असणे आवश्यक आहे. बिगर काँग्रेसी पक्ष, विशेषत: भाजपसारखे पक्ष केंद्र आणि राज्य या दोन्ही पातळ्यांवर बराच काळ विरोधी बाकांवर आहेत. त्यामुळे या पक्षांमध्ये एक विशिष्ट पातळीची प्रगल्भता, व्यावहारिकता आणि विधायक वृत्ती आहे. अशा बहुतेक पक्षांसाठी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत असताना कायदा आणि प्रशासनाच्या दृष्टीने काही मुद्द्यांवर एकमत होणे हा एक सामान्य अनुभव आहे. आपल्या बहुतेक लोकशाही इतिहासात हा नियम राहिला आहे. ही काही विकृती नाही.

अलीकडच्या काळात कॉंग्रेस पक्षाचे वर्तन हे विकृती आहे. काँग्रेस पक्ष सत्तेतून बाहेर पडल्यावर आणि विरोधी पक्षात गेल्यावरच त्यांनी कटु, शत्रुत्वपूर्ण आणि अशांत वातावरण निर्माण केले आहे. खुद्द काँग्रेसच्या काही नेत्यांनाही हे योग्य वाटत नाही. पण पक्षांतर्गत राजकीय भवितव्याच्या भीतीपोटी ते व्यक्त करत नाहीत.

याचे मुख्य कारण म्हणजे कॉंग्रेसचे सर्वोच्च नेतृत्वाला आपण अद्यापही सत्तेबाहेर गेलेलो आहो, असं वाटत नाही. देश पुढे गेला आहे ही वस्तुस्थिती त्यांना स्वीकारता आलेली नाही. पण जेवढा जास्त वेळ ते विरोधी पक्षात घालवतील, तेही शिकतील, अशी आशा आहे.

प्रश्न: भाजपविरोधी विचारसरणी असलेल्या पक्षांच्या नेत्यांचे भाजपने अतिशय मोकळेपणाने स्वागत केले आहे. हे काही प्रमाणात भाजपचा वैचारिक गाभा कमकुवत करणारा आहे, असे तुम्हाला वाटते का?

-बघा, २०१९ मध्ये भाजपला जवळपास २३ कोटी (२३० दशलक्ष) मते मिळाली होती. हे इतिहासात आजवर मिळालेल्या मतांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. यापैकी अनेकांनी २०१४ किंवा २०१९ मध्ये प्रथमच आम्हाला मतदान केले असेल. पूर्वी आमच्याबद्दल आणि आमच्या विचारधारेबद्दल बरेच गैरसमज असायचे. पण गेल्या काही वर्षांत अधिकाधिक लोक आमचे काम पाहत आहेत आणि त्यांना आमची विचारधारा आणि ध्येय आकर्षक वाटत आहेत. त्यामुळे समाजात मोठ्या प्रमाणावर भाजपकडे लोक आकर्षित होत आहेत. राजकीय क्षेत्रही यापासून अलिप्त राहिलेले नाही. म्हणूनच, ज्यांना आमचा दृष्टीकोन आणि ध्येयावर विश्वास आहे आणि त्यांना आमच्यासोबत यायचे आहे त्यांचे स्वागत आम्ही खुल्या मनाने करतो.

कम्युनिस्ट हे केवळ त्यांच्या भूतकाळाचे अडकले आहेत. हे लक्षात घेता आम्ही कदाचित भारतातील एकमेव वैचारिक आणि केडरप्रणित पक्ष आहोत. त्यामुळे आज तरुणाई आमच्या पक्षाकडे आकर्षित होत असून भाजप ही त्यांची पहिली पसंती आहे. घराणेशाहीवर आधारित पक्षांमध्ये त्यांच्या प्रतिभेचा गळा घोटला जातो. त्यांना पक्षात पुढे जाण्यासाठी चापलूसी करावी लागते. भाजपमध्ये सामान्य पन्नाप्रमुखही देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, हेही त्यांना ठाऊक आहे. कॅडरप्रणित असणे म्हणजे कोणताही एक गट किंवा कुटुंब पक्षाचे भवितव्य ठरवत नाही. त्यामुळे आमच्या पक्षात जो कोणी असेल त्याला 'नेशन फर्स्ट' या तत्त्वावर काम करून कार्यकर्त्यांचा विश्वास जिंकावा लागेल.

प्रश्न: नरेंद्र मोदींचं पुढे काय?

-मी भारतीचा सेवक आहे. माझं पुढे काय आहे याचा मी कधीच विचार करत नाही. १४० कोटी भारतीयांच्या माझ्या कुटुंबाची स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मी काय करू शकतो याचा मी विचार करत आहे. गेली १० वर्षे फक्त ट्रेलर होता. मला बरेच काही करायचे आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वी मी सर्व सरकारी विभागांना १०० दिवसांचा आराखडा तयार करण्यास सांगितले होते. आमचे संकल्पपत्र पुढील पाच वर्षांचा रोडमॅप देते. आम्ही २०४७ पर्यंत विकसित भारताचे व्हिजन तयार करत आहोत, ज्याचा पाया आधीच तयार झाला आहे.

आम्ही पहिल्या कार्यकाळात काँग्रेसच्या ६० वर्षांच्या राजवटीमुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढली. दुसऱ्या टर्ममध्ये भारताला विकासाच्या जलद मार्गावर नेले. आता आमचा तिसरा कार्यकाळ हा यापूर्वी कधीही न पाहिलेल्या वेगाने विकासाचे युग असेल. GYANM (गरीब, युवा, अन्नदाता, नारी शक्ती आणि मध्यमवर्गीय) या घटकांना सक्षम करणारे मॉडेल मजबूत आणि संरचित करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. हे सर्वच विकसित भारताचे शिल्पकार बनतील.

प्रश्न: बहुतेक राजकीय विश्लेषक हे आपल्या सरकारला तिसरी टर्म मिळेल असा अंदाज व्यक्त करत आहेत. फक्त प्रश्न बहुमताच्या आकाराचा आहे. तिसऱ्या टर्मचा सर्वात मोठा विषय कोणता असेल? दोन टर्ममध्ये करावयाचे राहून गेलेले सर्वात मोठे कोणते राहून गेले असं तुम्हाला वाटते?

-२०१४ मध्ये आम्ही सत्तेत आलो तेव्हा भूतकाळातील चुका दुरुस्त करून भक्कम पाया उभा करायचा होता. गरीब असो वा शेतकरी किंवा बँकिंग क्षेत्र असो वा अर्थव्यवस्था, प्रत्येकजण प्रचंड संकटात होता. एकीकडे शौचालये बांधणे, बँक खाती, गॅस कनेक्शन, वीज आदी मूलभूत बाबी आम्ही गरिबांपर्यंत पोहोचवल्या आणि दुसरीकडे अनेक सुधारणा करून बँकिंग क्षेत्र आणि अर्थव्यवस्थेला सावरले. आपल्या देशाने कोट्यवधी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आणि सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था देखील बनली. आपल्या सुधारणांमुळे मॅन्युफॅक्चरिंगपासून स्टार्ट अपपर्यंत आणि अंतराळापर्यंत अनेक क्षेत्रांंचा विकास झाला. आमच्या चांगल्या कामामुळे जनतेने आम्हाला दुसरी टर्म दिली, २०१९ मध्ये त्यापेक्षाही मोठा जनादेश दिला. दुसऱ्या टर्ममध्ये जनतेने भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनताना पाहिला.

जम्मू, काश्मीर आणि लडाखमधील कलम ३७० विरोधातील कारवाई असो किंवा कोविड-१९ चे यशस्वी व्यवस्थापन असो, किंवा विविध देशांना लस आणि औषधे पाठविणे असो किंवा महामारीनंतरच्या जागतिक व्यवस्थेतील परराष्ट्र धोरणातील यश असो, अशा अनेक घडामोडींमुळे भारतातील जनतेला स्वत:वर आणि देशाच्या भवितव्यावर नवा विश्वास निर्माण झाला आहे. पूर्वी आपल्या देशातील जनता गरिबी, भ्रष्टाचार आणि कुशासनामुळे बंदिस्त होती. या समस्यांशी रोजच्या झगड्यांमुळे त्यांना आपल्या किंवा देशाच्या भवितव्यासाठी मोठ्या दृष्टीकोनाची आकांक्षा बाळगता आली नाही.

परंतु गेल्या काही वर्षांतील आमच्या कामामुळे लोकांच्या आकांक्षांना पंख फुटले असून २०४७ पर्यंत विकसित भारत घडविण्याच्या दृष्टीकोनाला चालना मिळाली आहे. तिसऱ्या टर्मचा मोठा विषय हा या व्हिजनच्या पूर्ततेसाठी सर्व क्षेत्रांना गती देणे हा आहे. पुढील पाच वर्षांच्या योजनांपासून ते सरकारच्या पहिल्या १०० दिवसांच्या योजनेपर्यंत अनेक उद्दिष्टे घेऊन आम्ही सज्ज आहोत. खूप काही करण्याची गरज आहे आणि केले जाईल. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील हा सर्वात रोमांचक काळ असणार आहे.

प्रश्न: तुमच्या तिसऱ्या टर्ममध्ये लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी पुनर्रचना प्रक्रिया पाहायला मिळणार आहे. दोन्ही आव्हानात्मक असणार आहेत. या बदलांचा अर्थ काय असू शकतो? ते कसे हाताळणार?

-मतदारसंघ पुनर्रचना हे काही आपल्या देशात पहिल्यांदाच होत नाहीए. या प्रस्थापित प्रक्रिया आहेत ज्या विविध प्रसंगी घडल्या आहेत. याकडे राजकारणाच्या चष्म्यातून पाहण्याची गरज आहे असे मला वाटत नाही. अखेरची पुनर्रचना प्रक्रिया झाली तेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. एकदाही आम्ही कोणताही मुद्दा उपस्थित केला नाही. किंबहुना राज्य सरकार म्हणून आमच्याकडून जे काही हवे होते, ते आम्ही पूर्ण सहकार्य केले. लोकांना विश्वासात घेणे, त्यांचा विश्वास जिंकणे आणि सहमती निर्माण करणे हे आमच्या ट्रॅक रेकॉर्डचा एक भाग आहे.

सर्वांची मते विचारात घेऊन सर्वसहमतीने जीएसटी आणण्यात आला. पक्षीय विचारांच्या पलीकडे जाऊन आम्ही सर्वांचे प्रश्न सोडवले. आज जीएसटी परिषद हे विविध भागधारक एकत्र कसे काम करतात याचे उत्तम उदाहरण आहे.

आपण महिला आरक्षणाचा उल्लेख केला. लक्षात घ्या की हा एक असा विषय होता ज्यावर अनेक दशकांपासून एकमत होत नव्हते. पण सर्वांना विश्वासात घेऊन, एकमत घडवून आणण्याची आणि हे ऐतिहासिक विधेयक मंजूर करण्याची क्षमता आम्ही दाखवली.

अशी अनेक उदाहरणे मी तुम्हाला देऊ शकतो. मला खात्री आहे की आमचा स्वच्छ हेतू आणि स्पष्ट ट्रॅक रेकॉर्ड भविष्यातही अशा अनेक मुद्द्यांमध्ये आम्हाला मदत करेल.

WhatsApp channel