Lok Sabha Elections 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवारांसोबत गेलेले पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्या पक्षांतराचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आज हजेरी लावल्यानंतरही याचा उलगडा झालेला नाही. लंके आणि पवारांच्या पक्षानंही यावर थेट बोलणं टाळलं.
लंके हे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. तिथं सध्या भाजपचे सुजय विखे-पाटील हे खासदार आहेत. महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ भाजपला गेला आहे. भाजपनं सुजय विखे यांची उमेदवारी देखील घोषित केली आहे. त्यामुळं लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम असलेल्या लंके हे मोठ्या पवारांच्या सोबत जातील, अशी चर्चा आहे.
नीलेश लंके हे दांडगा जनसंपर्क असलेले आमदार ओळखले जातात. कोविड काळात त्यांनी केलेल्या कामाची राज्यभरात प्रशंसा झाली होती. गेल्या काही काळापासून त्यांनी पारनेर तालुक्याच्या बाहेरही आपला संपर्क वाढवला आहे. खासदार अमोल कोल्हे यांच्याशी त्यांच्या भेटीगाठीही झाल्या होत्या. त्यामुळं त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेला जोर चढला आहे.
लंके यांच्या ‘मी अनुभवलेला कोविड’ या पुस्तकाचं प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते आज पुण्यातील पक्ष कार्यालयात झालं. त्यावेळी शरद पवार यांच्या उपस्थितीत लंके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तुमच्या हाती घड्याळ आहे की तुतारी, असा प्रश्न पत्रकारांनी लंके यांना विचारला. त्यावर, साहेब सांगतील तो आदेश, असं सूचक विधान केलं. मात्र, पक्षात प्रवेश केला आहे की नाही हे सांगणं त्यांनी टाळलं.
शरद पवार व जयंत पाटील यांनीही यावेळी लंके यांच्या कामाचं जोरदार कौतुक केलं. लंके हे पवार साहेबांच्या विचारांचेच आहेत, असं जयंत पाटील म्हणाले. पक्षाच्या कार्यालयात त्यांचं स्वागत आहे, असं पाटील म्हणाले. मात्र त्यांनीही लंके यांच्या पक्षप्रवेशावर बोलणं टाळलं.
दोनच दिवसांपूर्वी मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणारे माजी नगरसेवक वसंत मोरे हे देखील आज शरद पवार यांच्या पक्षाच्या कार्यालयात आले होते. त्यामुळं ते पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा होती. मात्र, तसं काहीच झालं नाही. त्यामुळं नेमकं काय झालं याविषयी आता तर्कवितर्क लावले जात आहेत.