Narendra Modi on Jan Dhan account : 'काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष सत्तेत आल्यास आमच्या सरकारनं उघडलेली ५० कोटींहून अधिक जनधन बँक खाती बंद करतील आणि त्यातील पैसे हिसकावून घेतील, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केला.
उत्तर प्रदेशातील श्रावस्ती इथं झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. मोदी यांनी यावेळी काँग्रेस व इंडिया आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. 'आमच्या सरकारनं गावोगाव वीज पोहोचवली आहे. हे लोक वीज तोडून पुन्हा अंधार निर्माण करतील. आमचं सरकार प्रत्येक घरात पाणी पुरवत आहे, सपा-काँग्रेसचे लोक तुमच्या घराचा पाण्याचा नळही उखडून घेऊन जातील आणि ते यात तज्ज्ञ आहेत, असा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला.
'आमच्या सरकारनं गरिबांना ४ कोटी घरं दिली आहेत. आमचा हा निर्णय फिरवण्याचं समाजवादी पक्ष आणि काँग्रेसनं ठरवलं आहे. याचा अर्थ ते तुमच्या ४ कोटी घरांच्या चाव्या काढून घेतील. ती घरं हिसकावून घेतील आणि त्यांच्या व्होट बँकेला देतील, असा आरोप मोदी यांनी केला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस जिंकली तर आज तुरुंगात असलेल्या दहशतवाद्यांना पंतप्रधानांच्या घरी बोलावून बिर्याणी खायला दिली जाईल, असा दावाही मोदींनी केला.
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला. ‘ज्यांनी ६० वर्षे काहीच केलं नाही, ते मोदींना रोखण्यासाठी एकत्र आले आहेत. यूपीमध्ये पुन्हा दोन मुलांची जोडी लाँच करण्यात आली आहे. तोच जुना फ्लॉप चित्रपट, तीच जुनी व्यक्तिरेखा, तेच जुने संवाद. निवडणूक संपायला आलीय, पण या लोकांकडून तुम्ही एकही नवीन गोष्ट ऐकली का? दोन्ही राजपुत्र विकासावर काहीच बोलताना दिसत नाहीत. मग ते मत का मागत आहेत?,’ असं सवाल मोदी यांनी केला.
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या संयुक्त सभेला प्रचंड गर्दी झाल्याच्या व्हायरल व्हिडिओवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. ‘काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचे लोक त्यांच्या सभांना गर्दी जमवण्यासाठी कंत्राट देत आहेत. एका सभेला आलेल्या लोकांना पैसे मिळाले नाहीत म्हणून लोक स्टेजच्या दिशेनं धावत गेले. जर त्यांची हीच परिस्थिती असेल तर ते तुमच्यासाठी काम कसं करतील?,’ अशी विचारणाही मोदी यांनी केली.