Amol Kolhe : मतदानाला दोन दिवस बाकी असताना अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय, अभिनय क्षेत्रातून ५ वर्षासाठी घेतला ब्रेक
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Amol Kolhe : मतदानाला दोन दिवस बाकी असताना अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय, अभिनय क्षेत्रातून ५ वर्षासाठी घेतला ब्रेक

Amol Kolhe : मतदानाला दोन दिवस बाकी असताना अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय, अभिनय क्षेत्रातून ५ वर्षासाठी घेतला ब्रेक

May 10, 2024 06:11 PM IST

Amol Kolhe Break From Acting : छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या ऐतिहासिक भूमिकांमुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेल्या अमोल कोल्हे यांनी पुढील पाच वर्षासाठी अभिनयातून ब्रेक घेतला आहे.

अमोल कोल्हेेंनी घेतला अभिनय क्षेत्रातून ५ वर्षासाठी ब्रेक
अमोल कोल्हेेंनी घेतला अभिनय क्षेत्रातून ५ वर्षासाठी ब्रेक

Shirur Lok Sabha constituency : लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्याचा प्रचार संपण्यासाठी एक दिवस शिल्लक असताना शिरुरमधील शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी मोठी घोषणा केली असून अभिनयावरुन डिवचणाऱ्यांना चांगलेच फटकारले आहे. अभिनयातून मतदारसंघासाठी वेळ देत नसल्याच्या विरोधकांकडून होणा-या टीकेनंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे (amol kolhe )यांनी पुढील पाच वर्षांसाठी अभिनय क्षेत्राला रामराम ठोकण्याची घोषणा केली आहे. पाच वर्षे स्क्रीनवर न दिसता पूर्णवेळ मतदारसंघासाठी काम करणार असल्याचेही कोल्हे यांनी म्हटले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या ऐतिहासिक भूमिकांमुळे अमोल कोल्हे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले आहेत. राष्ट्रवादीने त्यांना २०१९ मध्ये शिरुर मतदारसंघातून (shirur Los sabha constituency) तिकीट देत निवडून आणले. मात्र खासदार झाल्यानंतर त्यांच्याकडून मतदारसंघात वेळ दिला जात नसल्याची टीका सातत्याने केली जात आहे. मालिकांच्या चित्रीकरणात व्यस्त असल्याने त्यांना मतदारसंघात फिरकण्यास वेळ मिळत नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात असून हा मुद्दा प्रचारात कळीचा झाला होता. अभिनेत्याला मतदारसंघाचे किंवा जनतेचे प्रश्न काय समजणार,त्यांना जनतेसाठी वेळ नाही. चित्रीकरणातच व्यस्त आहेत अशी टीका अजित पवारांनी केली होती. त्यानंतर आता कोल्हे यांनी मोठा निर्णय घेत अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला आहे.

खासदार अमोल कोल्हे यांनी आगामी पाच वर्षांसाठी अभिनय क्षेत्राला रामराम केला आहे. याची घोषणा करताना अमोल कोल्हे म्हणाले की, राजकारण हा अर्धवेळ व्यवसाय नसून पूर्णवेळ सेवेचे क्षेत्र आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग, पुणे-अहमदनगर महामार्ग यासाठी १९ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी आला आहे. निविदा प्रक्रिया सुरु आहे. हे प्रकल्प प्राधान्याने मार्गी लावणे गरजेचे आहे. २०० खाटांचे रुग्णालय, राष्ट्रीय वन औषधी संशोधन केंद्र हे प्रकल्प दृष्टीक्षेपात आहेत. या प्रकल्पांसाठी पूर्ण वेळ काम करावे लागणार असल्याने मालिका विश्व, अभिनयाला पुढील पाच वर्षांसाठी रामराम करण्यास काहीच हरकत नाही.

चौथ्या टप्प्यातील प्रचार आता शेवटच्या काही तासांवर आला आहे. यामुळे उमेदवार व नेत्यांकडून प्रचारसभा, बाईक रॅली व प्रचाराची लगबग सुरू आहे. शिरुरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार व अजित पवार गटात सांना होत आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे विरुद्ध अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात थेट सामना होत आहे.

अजित पवारांनी कोल्हे यांना पराभूत करण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली आहे. गुरुवारी अजित पवारांनी या मतदारसंघात सभा घेऊन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अशोक पवार यांना पुन्हा आमदार म्हणून कसा निवडून येतो ते बसतोच, असा दमही दिल्याने मतदारसंघात हा चर्चेचा विषय बनला आहे.

 

Whats_app_banner