पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, विकसित भारतासाठी ४०० पार, विकसित कर्नाटकसाठी ४०० पार, गरीबी कमी करण्यासाठी ४०० पार, दहशतवादावर प्रहार करण्यासाठी ४०० पार, भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाईसाठी ४०० पार, शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी ४०० पार, तरुणांच्या उज्जवल भविष्यासाठी त्यांना नव्या संधीसाठी ४०० पार, अबकी बार ४०० पार, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला. कर्नाटकमधील शिमोगा येथे सभेला संबोधित करताना मोदींनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, तुम्हा सर्वांचे प्रेम आशीर्वाद, कर्नाटकच्या कानाकोपऱ्यातून जनसमर्थनाची ही लाट भाजपला मिळत आहे. हे अपार जन समर्थन, ही ऊर्जा, हे दृश्य पाहून वाटत आहे की, संपूर्ण मैदान ऊर्जेने भरले आहे. दुसरीकडे भ्रष्टाचार आणि तुष्टीकरणात बुडालेल्या इंडी आघाडीची झोप उडाली असेल.
मोदी म्हणाले, मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरील सभेतून शक्ती नष्ट करण्याची घोषणा करण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला किती वेदना झाल्या असतील. नारीशक्ती, त्यांचा आशीर्वादच माझे सर्वात मोठे कवच आहे. इंडिया आघाडीला हिंदू धर्मातील शक्ती नष्ट करायची आहे. भारत मातेच्या वाढत्या प्राबल्याचा त्यांना राग आहे. शक्तीवर वार म्हणजे महिला, मुली आणि भारत मातेवर वार आहे, असेही मोदी म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले की, काही महिन्यातच काँग्रेस सरकारने कर्नाटकच्या प्रतिष्ठेला धक्का दिला आहे. मी काँग्रेसबाबत कर्नाटकच्या लोकांचा आक्रोश पाहत आहे. त्यांचा राग समजू शकतो. काँग्रेस सरकारच्या या धोरणामुळे कर्नाटकच्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघात भाजप व NDA उमेदवारांचा विजय आवश्यक आहे. NDAचे खासदार कर्नाटकच्या लोकांची सेवा करतील. येथे केंद्रातील योजना लागू करण्यास मदत करतील.
राहुल गांधी यांच्या विधानाचा समाचार घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले की, देशाने 'चंद्रयान'चे यश 'शिव शक्ति' ला समर्पित केले आहे. विरोधक 'शक्ति'ला नष्ट करण्याचा विचार करत आहेत.