Pm Narendra Modi : काँग्रेसने आपल्या अध्यक्षांना बाथरूममध्ये बंद केले होते, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Pm Narendra Modi : काँग्रेसने आपल्या अध्यक्षांना बाथरूममध्ये बंद केले होते, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

Pm Narendra Modi : काँग्रेसने आपल्या अध्यक्षांना बाथरूममध्ये बंद केले होते, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

May 22, 2024 03:40 PM IST

Narendra Modi Rally : काँग्रेस घराणेशाहीचा पक्ष असून आपल्या पक्षाचे संविधान मानत नाही. सीताराम केसरी (SitaramKesari) काँग्रेसचे अध्यक्ष होते. एका सायंकाळी मॅडम सोनियाच्या टोळीने सीताराम यांना बाथरूममध्ये बंद केले होते, असा हल्लाबोल नरेंद्र मोदींनी केला.

पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

Narendra Modi rally in Basti : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बस्‍ती येथील जनसभेला संबोधित करताना सीताराम केसरी यांचा उल्लेख करत काँग्रेसवर मोठा घणाघात केला. मोदी म्हणाले की, काँग्रेसला आता संविधानाची आठवण येत आहे. याच काँग्रेसने आणीबाणी लादून संविधान संपवण्याचा प्रयत्न केला होता. हा घराणेशादीचा पक्ष आपल्या पक्षाचे संविधान मानत नाही. सीताराम केसरी (sitaram kesari) काँग्रेसचे अध्यक्ष होते. एका सायंकाळी मॅडम सोनियाच्या टोळीने सीताराम यांना बाथरूममध्ये बंद केले होते. त्यानंतर उचलून रस्त्यावर फेकले होते. त्यानंतर सोनिया गांधी यांना अध्यक्ष बनवले होते.

पंतप्रधान मोदींचा भाषण करून गळा बसला आहे, त्यांनी बस्‍तीमध्ये सभेला संबोधित करताना म्हटले की, देशात लोकसभा निवडणुकीचे पाच टप्पे पार पडले असून या ५ टप्प्यातील मतदानात देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार पक्के केले आहे. सपा आणि काँग्रेसला मिळणारे एकही मत काही कामाचे आहे का? आपले मत वाया जाईल असे कोणत्याही मतदाराला वाटणार नाही. तुमचे मत त्यालाच गेले पाहिजे ज्याचे सरकार तुम्हाला बनवायचे असेल. 

या भागातील जनतेने नेहमी आमच्या आश्वासनावर, विचारांवर व आमच्या धोरणांवर विश्वास ठेवला. हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी याआधी कोणती कसर ठेवली आहे ना यापुढे ठेवेन. ही मोदीची गारंटी आहे. मी यापूर्वी येथे आलो आहे. याआधी असे दृश्य पाहण्याचे भाग्य मिळाले नाही. अनेक लोक उन्हात बसले आहेत. त्यांच्यासाठी मंडप कमी पडला. मी त्यांची क्षमा मागतो. त्यांची व्यवस्था करण्यात आम्ही कमी पडलो. 

मोदी म्हणाले की, इंडी आघाडीवाले वेगवेगळे आकडे सांगत आहेत. ही आघाडी नैराश्येत बुडाली आहे. त्यांना दोन दिवसापूर्वी आणि आज बोललेल्या गोष्टींची माहिती नाही. कोणीही आपले मत वाया जाऊ देत नाही. त्यांनी लोकांना आवाहन केले की, त्यांनी आपले मत विकसित भारताला द्यावे, आत्मनिर्भर भारताला द्यावे. 

पीएम मोदी म्हणाले की, २२ जानेवारी २०२४ चा दिवस सर्वांसाठी यादगार आहे. २२ जानेवारी म्हणताच देश जय श्रीराम बोलतो. भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. भारताची प्रतिष्ठा व सन्मान वाढला आहे. भारत जागतिक मंचावरून बोलतो तेव्हा जग लक्ष देऊन ऐकते. भारत निर्णय घेतो तेव्हा जग पुढे पाऊल टाकते. दहशतवादाला खतपाणी देणारा देश डोळे वटारत होता. धमक्या देत होता. त्याची अवस्था आता ना घर का ना घाट का झाली आहे. आता त्या देशाचा मित्र सपा, काँग्रेस भारताला भिती दाखवत आहे. त्यांना माहिती नाही, ५६ इंची छाती काय असते? पाकिस्तानला घाबरा त्यांच्याकडे अनुबॉम्ब आहे. भारतला याची काळजी करायला हवी का? भारतात काँग्रेसचे कमजोर सरकार नसून मोदींचे मजबूत सरकार आहे. 

मोदी म्हणाले भारत कोणालाही भीती दाखवत नाही. मात्र भीती दाखवणाऱ्याला माफ करणार नाही. भारत आता घरात घुसून मारतो.  सपा-काँग्रेसच्या दोन्ही राजपुत्रांच्या फ्लाप रिलीजने मला आश्चर्य होते. हे म्हणतात यूपीमध्ये ७९ जागा जिंकणार. दिवसा स्वप्न पाहण्याचा अर्थ आता समजला. ४ जून रोजी यूपीची जनता त्यांना झोपेतून जागे करणार आहे. तेव्हा ते पराभवाचे खापर ईवीएमवर फोडणार आहेत. देश ५०० वर्षापासून राम मंदिराची प्रतीक्षा करत होता. इंडी वाल्यांना रामाचा त्रास होता. सपाचे मोठे नेते राम मंदिराला बेकार म्हणतात. राम मंदिरात जाणाऱ्या राम भक्तांना पाखंडी म्हणतात. हे लोक सनातन धर्माच्या विनाशाच्या गोष्टी करतात. यांची प्रमुख काँग्रेस पार्टी आहे. काँग्रेसचे राजपुत्र राम मंदिराबाबत सुप्रीम कोर्टाचा निर्णय बदलणार आहेत. मंदिरावर बाबरी टाळे लावणार आहेत.

Whats_app_banner