देशात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे. येत्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. याआधीच भाजपने आपली तयारी सुरू केली असून १९५ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. मात्र या यादीत वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांना स्थान नसल्याने त्यांच्या उमेदवारीबाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या. उद्धव ठाकरे यांनीही पहिल्या यादीत नितीन गडकरींना (Nitin Gadkari) स्थान दिले नाही, पण कृपाशंकर सिंह यांना उमेदवारी दिल्याबद्दल भाजपवर टाकी केली होती. आता नितीन गडकरींच्या उमेदवारीबाबत नवी माहिती समोर आली आहे.
५ दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी यवतमाळ दौरा करत अनेक विकासकामांचे उद्धाटन केले होते. सोमवारी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नागपूर विमानतळावर सकाळी आगमन झाले. येथून ते तेलंगणाला गेले. या दोन्ही वेळा त्यांच्या स्वागताला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. यावेळी मोदींनी नागपुरातील काही भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधल्याचे सांगितले जात आहे.
तेलंगणा दौऱ्यावर जाताना मोदी आज नागपूर एअरपोर्टवर थोडा वेळ थांबले होते. यावेळी मोदींनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. यावेळी नितीन गडकरी व बावनकुळे त्यांच्या स्वागताला उपस्थित होते. यावेळी बावनकुळे तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनी लोकसभेच्या दुसऱ्या यादीत गडकरी यांचे नाव येऊ दे, अशी विनंती पंतप्रधानांकडे केल्याचं समजते.
भाजपने जाहीर केलेल्या १९५ जणांच्या पहिल्या यादीत ३४ केंद्रीय मंत्र्यांचा समावेश होता. यामध्ये गडकरींचे नाव नसल्याने गडकरी समर्थन चिंतेत होते. एका मुलाखतीत गडकरी यांनी देशातील गरीब मजूर दु:खात असल्याचे म्हटले होते. यावरून विरोधकांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. त्यातच मोदी-गडकरींमध्ये फार मधुर संबंध नसल्याचे बोलले जात असतं. त्यातच २०२४ ला गडकरींना तिकीट मिळणार नाही, अशी वर्षभरापासून चर्चा सुरू आहे, त्यातच पहिल्या यादीतून डावलल्याने गडकरी समर्थक व नागपुरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र आता मोदींच्या भेटीत यावर तोडगा निघाल्याचे सांगितलं जातंय.
नागपूर मतदारसंघातील (nagpur lok sabha concituncy) भाजपचे निरीक्षक खा. मनोज कोटक व माजी खासदार अमर साबळे यांनी नागपूर भाजप कार्यालयात शहरातील ७० प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत नुकतीच एक बैठक घेतली. या बैठकीत नागपुरातून नितीन गडकरी हेच उमेदवार म्हणून हवे असल्याचे सांगितले गेले. आता बावनकुळे यांनीही सांगितले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेच नागपूरचे उमेदवार राहतील आणि ते ६५ टक्के मते घेऊन विजयी होतील. गडकरी यांच्याबाबत संब्रण पसरविणारा एक व्हिडिओ चिटिंग करून व्हायरल केला जात आहे. त्यासंदर्भात आम्ही कायदेशीर नोटीस बजावली आहे.