महाविकास आघाडी व वंचितमधील बैठका निष्फळ झाल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी वेगळी वाट धरत महाराष्ट्रातील काही जागांवर आपले उमेदवार जाहीर केले. मात्र सात जागांवर काँग्रेसला पाठिंबा देण्याची भूमिका त्यांनी जाहीर केली होती. प्रकाश आंबेडकर यांनी स्वत: अकोल्यातून उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर काँग्रेससह महाविकास आघाडीच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. काँग्रेस अकोल्यात उमेदवार देणार नसल्याचे म्हटले जात होते, मात्र काँग्रेसने १० वी उमेदवार यादी जाहीर करत अकोल्यातून प्रकाश आंबेडकरांविरोधात आपला उमेदवार रिंगणात उतरवला. याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
वंचिने ११ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केल्यानंतर वंचित मविआपासून दूर झाल्याचं स्पष्ट झालं. पहिल्या यादीत पूर्व विदर्भातील मतदारसंघाचा समावेश होता तर दुसऱ्या यादीत वंचितनं मराठवाडा, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. वंचितने सोलापुरात प्रणिती शिंदेंविरुद्ध तर लातुरमध्येही काँग्रेसविरोधात आपला उमेदवार दिला. यामुळेच काँग्रेसनेही प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध उमेदवार देत जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
याबाबत नाना पटोले म्हणाले की, समविचारी पक्षांमध्ये मतांचं विभाजन होऊ नये यासाठी आम्ही वंचितला सोबत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र बहुजन आघाडीने वारंवार आमची चेष्टाच केली. मात्र तरीही आम्ही काँग्रेस पक्षश्रेष्ठींना राज्यातील परिस्थिती समजून सांगितली होती. आम्ही पूर्ण तयारी देखील केली होती. मात्र त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभं करण्याचं काम सुरू केलं. याचा अर्थ त्यांना आमची गरज नसल्याचे दिसत होते. यामुळे आम्ही अकोल्यातून त्यांच्याविरोधात उमेदवार उभा केला.
मुंबईत झालेल्या भारत जोडो यात्रेच्या समारोप सभेत प्रकाश आंबेडकरही सहभागी झाले होते. त्यानंतर वंचित महाविकास आघाडीत सामील होत असल्याचे बोलले जात होते. मात्र महाविकास आघाडीच्या वंचितसोबत अनेक बैठका होऊनही त्यांच्यात जागावाटपाचा तिढा सुटत नव्हता. महाआघाडीने पाच जागा दिल्यानंतरही प्रकाश आंबेडकरांनी हा प्रस्ताव धुडकावत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामध्ये, प्रकाश आंबेडकर हे अकोल्यातून निवडणुकांच्या मैदानात उतरले आहेत. मात्र आता अकोल्यात तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.