Mumbai North West Lok Sabha: रवींद्र वायकर की अमोल कीर्तिकर? कोणाची विजयाच्या दिशेने वाटचाल?
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Mumbai North West Lok Sabha: रवींद्र वायकर की अमोल कीर्तिकर? कोणाची विजयाच्या दिशेने वाटचाल?

Mumbai North West Lok Sabha: रवींद्र वायकर की अमोल कीर्तिकर? कोणाची विजयाच्या दिशेने वाटचाल?

Jun 04, 2024 01:24 PM IST

Mumbai North West Lok Sabha: मतमोजणीच्या या टप्प्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर सध्या आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे.

रवींद्र वायकर की अमोल कीर्तिकर? कोणाची विजयाच्या दिशेने वाटचाल?
रवींद्र वायकर की अमोल कीर्तिकर? कोणाची विजयाच्या दिशेने वाटचाल?

Mumbai North West Lok Sabha: मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदार संघात सध्या धनुष्यबाण विरुद्ध मशाल अशी चुरशीची लढत रंगताना दिसत आहे. लोकसभा निवडणूक २०२४च्या या निकालाची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत. यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. अशातच मुंबईतील उत्तर पश्चिम मतदार संघातील दोन्ही उमेदवारांकडे सगळ्यांचे विशेष लक्ष आहे. मुंबईच्या उत्तर-पश्चिम मतदार संघातून शिवसेना एकनाथ शिंदे गट या पक्षाकडून रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अमोल कीर्तिकर यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे. मतमोजणीच्या या टप्प्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर सध्या आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. तर, शिवसेना शिंदे गटाकडून या ठिकाणी रवींद्र वायकर निवडणुकीच्या रिंगणात असून, अवघ्या काही मतांनी ते पिछाडीवर आहेत.

उत्तर-पश्चिम मतदार संघातील आतापर्यंतच्या मतमोजणीच्या आकडेवारीनुसार, उद्धव ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकर यांना १ लाख ४४ हजार १६४ मतं मिळाली आहेत. तर, शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांना १ लाख ४३ हजार ८१५ मतं मिळाली आहेत. अमोल कीर्तिकर यांच्याकडे अवघ्या ३४९ मतांची आघाडी आहे. मात्र, ३४९ मतांच्या आघाडीने ते विजयाच्या दिशेने घौडदौड करताना दिसत आहेत. सध्या रवींद्र वायकर आणि अमोल कीर्तिकर या दोन्ही उमेदवारांमध्ये चुरशीची लढत असल्याचं पाहायला मिळत आहे.

Kangana Ranaut: अभिनेत्री कंगना रनौत निवडणुकीच्या रणातही चमकणार! मंडी लोकसभा मतदार संघात आघाडीवर

मतांची चढाओढ सुरू

मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनुसार दोन्ही उमेदवारांमधील ही मतांची चढाओढ आणखीनच रंगत चालली आहे. मुंबईतील या मतदार संघातील लढत अत्यंत चुरशीची झाली असून, सरते शेवटी कोण बाजी मारणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदार संघाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांनी सलग गेली दोन निवडणुका खासदारकी भूषवली आहे. राज्यातील राजकीय फाटाफुटीनंतर गजानन कीर्तिकर यांनी एकनाथ शिंदे यांचा हात धरून शिवसेना पक्षात प्रवेश केला.

दोघांपैकी कोण बाजी मारणार?

मात्र, गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही. ते शिवसेना उद्धव ठाकरे गटात टिकून राहिले. तर, उद्धव ठाकरे यांनीही अमोल कीर्तिकर यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी जाहीर केली होती. दुसरीकडे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाकडून रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्यात आली. रवींद्र वायकर हे अतिशय तगडे उमेदवार असून, त्यांनी राज्यात मंत्रिपद देखील भूषवले आहे. जोगेश्वरी विधानसभेत त्यांची चांगली पकड आहे. आता या दोघांपैकी कोण बाजी मारणार, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. अवघ्या काही मतांच्या अंतराने दोघांमध्ये ही चुरस पाहायला मिळत आहे.

Whats_app_banner