2024 election results lok sabha: भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ४०० हून अधिक जागांवर विजय मिळवणार असल्याचा दावा केला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या निकालात वेगळच चित्र पाहायला मिळाले. महाराष्ट्रात महायुतीला बहुमत मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता. यामुळे निकालापूर्वीच कार्यकर्त्यांनी मुंबईत जल्लोषाची तयारी केली. मात्र, उत्तर मुंबईत मतदारसंघ वगळता दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार विजय झाले. हे समजताच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोषासाठी आणलेले ढोलताशे परत पाठवले, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भाजप नेते पीयूष गोयल यांनी उत्तर मुंबईतून विजय मिळवला. तर, ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत दक्षिण मुंबई मतदारसंघातून आणि अनिल देसाई यांनी दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून, काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड यांनी उत्तर मध्य मुंबईतून विजय मिळवला. अरविंद सावंत, अनिल देसाई आणि वर्षा गायकवाड यांनी अनुक्रमे शिंदे गटाच्या यामिनी जाधव, राहुल शेवाळे आणि भाजप उमेदवार उज्वल निकम यांचा पराभव केला.
लोकसभा निवडणुकीत जनतेने तिसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर विश्वास दाखवला असून त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी गेल्या दशकभरात केलेली चांगली कामे यापुढेही करत राहू, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिली.
लोकसभा निवडणूक २०२४ च्या निकालावर प्रतिक्रिया देताना नरेंद्र मोदी म्हणाले की, जनतेने सलग तिसऱ्यांदा एनडीएवर विश्वास ठेवला आहे. भारताच्या इतिहासातील ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे.' या आपुलकीबद्दल मी जनता जनार्दनला नमन करतो आणि त्यांना आश्वासन देतो की लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही गेल्या दशकात केलेले चांगले कार्य चालू ठेवू,' असे मोदी यांनी एक्सवर लिहिले. 'मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांच्या मेहनतीबद्दल सलाम करतो. त्यांच्या अपवादात्मक प्रयत्नांना शब्द कधीच न्याय देणार नाहीत, असेही ते म्हणाले.
मतमोजणीला १० तास उलटले तरी भारतीय जनता पक्ष १९६ जागांवर आघाडीवर असून ५४३ जागांपैकी एका बिनविरोध सह ४५ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसने ८३ जागांवर आघाडी घेतली होती आणि १५ जागा जिंकल्या होत्या. बहुमतासाठी २७२ जागांची गरज आहे. २०१९ मध्ये भाजपने ३०३ जागा जिंकल्या होत्या. तर, २०१४ मध्ये मोदी पहिल्यांदा सत्तेत आले, तेव्हा त्यांना २८२ जागा मिळाल्या होत्या.
संबंधित बातम्या