MNS Gudi Padwa Rally Teaser : राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपप्रणित महायुतीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू झाली होती. मात्र, अचानक ही चर्चा बंद झाल्यामुळं अनेक राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. मनसे कुठं आहे, असे प्रश्नही विचारले जात आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मनसे अध्यक्ष राज ठाकरे ९ एप्रिलच्या गुढीपाडवा मेळाव्यात देणार आहेत.
मनसेचा दरवर्षी होणारा गुढीपाडवा मेळावा यंदा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत आहे. या मेळाव्याच्या आधी पडद्याआड बरंच काही राजकारण घडून गेलं आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली होती. मनसे भाजपप्रणित महायुतीत जाणार असल्याचं बोललं जाऊ लागलं होतं. मनसेच्या नेत्यांनीही तसं सुतोवाच केलं होतं. मात्र, अचानक ही चर्चाच बंद झाली. त्याविषयी वेगवेगळे तर्कवितर्क लावले जाऊ लागले.
मनसेला सोबत घेतल्यास अमराठी मतदार नाराज होईल असं बोललं गेलं. राज ठाकरे यांना शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रमुखपदाची ऑफर देण्यात आल्याचं बोललं गेलं. जागावाटपावरून अडल्याचंही बोललं गेलं. हे सगळं सुरू असताना राज ठाकरे यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता गुढीपाडव्याच्या सभेत पडद्यामागील गोष्टी समोर येणार आहेत.
गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मनसेनं एक व्हिडिओ टीझर प्रसिद्ध केला आहे. राज ठाकरे यांच्या आवाजातील हा व्हिडिओ आहे. त्यात त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ९ एप्रिलला शिवतीर्थावर येण्याचं आवाहन केलं आहे. ‘सालाबादप्रमाणे या वर्षी ९ एप्रिलला गुढीपाडवा मेळावा आहे. गेले काही आठवडे आपल्या पक्षाबद्दल चर्चा आणि तर्कवितर्क घडवले गेले आहेत. याकडं मी शांतपणे बघत होतो. तुम्हालाही अनेकांनी प्रश्न विचारून भंडावून सोडलं असेल. पण आता या सगळ्यावर बोलण्याची वेळ आली आहे. नक्की काय घडतंय, घडवलं जातंय हे सांगण्याची वेळ आली आहे. ९ एप्रिलला शिवतीर्थावर या. मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचं आहे,’ असं राज यांनी म्हटलं आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेची भूमिका नेमकी काय असणार आहे याचं उत्तर राज ठाकरे या मेळाव्यातून देण्याची शक्यता आहे. मनसे महायुतीच्या सोबत जाणार की स्वबळावर लढणार की निवडणुकीपासून अलिप्त राहणार, याचं उत्तर गुढीपाडव्याच्या सभेत मिळेल असं बोललं जात आहे.